कसई दोडामार्ग : राज्य सरकारने धनगर समाजाची आरक्षणाची मागणी अजूनही पूर्ण केलेली नाही. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी पंढरपूर बारामती येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात दोडामार्ग, सावंतवाडी तालुक्यातील धनगर समाजाबांधव उपस्थित होते. यावेळी आरक्षण न दिल्यास याचा परिणाम निवडणुकांमध्ये दिसून येईल, अशा इशारा सरकारला दिल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा धनगर मंडळाचे सरचिटणीस नवल गावडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. घटनेत धनगर समाजाला आरक्षण देऊनही गेली ६० वर्षे प्रस्थापित राज्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. धनगर समाजाला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सवलतीपासून तसेच अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून जाणीवपूर्वक वंचिंत ठेवले. धनगर समाजालाही आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पंढरपूर ते बारामती या पदयात्रेचे आयोजन करून धनगर समाजाची एकजूट दाखविली. सुमारे आठ लाख समाजबांधव यावेळी उपस्थित होते. धनगर समाजाच्या आरक्षणास विरोध करणाऱ्या मधुकरराव पिचड, शिवाजीराव मोघे यांचा जिल्ह्यातील धनगर समाजावतीने मंडळाचे चिटणीस नवल गावडे व तालुकाध्यक्ष तानाजी वरक यांनी निषेध व्यक्त केला आहे. बारामती येथे मेळाव्याला सखाराम झोरे, जयदेव लांबर, संतोष झोरे, जानू झोरे, धाकू झोरे, समीर तारे, तेजस तारे, सुनील खरवत, राजा झोरे, भैरू झोरे, रामा पटकारे, आनंद पटकारे, लक्ष्मण बरागडे, धोंडू पाटील, लक्ष्मण पाटील आदींचा सहभाग होता. (वार्ताहर)
आरक्षण न दिल्यास परिणाम
By admin | Updated: July 23, 2014 21:56 IST