वैभव साळकर ल्ल दोडामार्ग जैवविविधतेने संपन्न असलेल्या तिलारी खोऱ्यातील जंगलात दुर्मीळ मानला जाणारा उडता सोनसर्प व ‘मलबार ट्रॉगन’ हा पक्षी आढळून आला आहे. सावंतवाडी येथील वाईल्ड कोकण या संस्थेच्या सदस्यांनी वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने केलेल्या तिलारी खोऱ्यातील जंगल सफरीवेळी त्यांना या दुर्मीळ पक्षी व सापाचे दर्शन झाले. जगभरात अतिशय दुर्मीळ मानली जाणारी ही प्रजाती जंगलात आढळल्याने पक्षी व प्राणी अभ्यासकांसाठी ही बाब नक्कीच सुखावणारी आहे. दोडामार्ग तालुक्यातील तिलारीचे खोरे जैवविविधतेने संपन्न आहे. कोकणच्या खास वैशिष्ट्यांपैकी एक अशी या खोऱ्याची प्रचिती आहे. पश्चिम घाटामध्ये या खोऱ्याचा समावेश होतो. या ठिकाणी विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आढळतात. येथे मिळणारा घनदाट जंगलाचा सुखद गारवा, पाण्याची सोय आणि दुर्गम अशी डोंगररचना यामुळे तिलारीचा जंगल परिसर नेहमीच निसर्गप्रेमी, प्राणी व पक्षी अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरला आहे. येथे दरवर्षी विविध हंगामांत अभ्यासकांची मांदियाळी सुरू असते. शिवाय गोवा, कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर असल्याने महाराष्ट्रासह येथे अनेक ठिकाणचे अभ्यासक कायम येत असतात. सावंतवाडी येथील वाईल्ड कोकण या संस्थेच्या सदस्यांनी वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने तिलारी परिसरातील वन्यजीव पाहण्यासाठी जंगल सफरीचे आयोजन केले होते. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष प्रा. धिरेंद्र होळीकर, सचिव डॉ. गणेश मर्गज, खजिनदार महेंद्र पटेकर, चंद्रवदन कुडाळकर, संजय देसाई, निखिल नाईक, मकरंद नाईक, संजय नाटेकर, भूषण प्रभू, जगदीश सावंत, अश्विनी जोशी, आदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध भागांतील वनांची, वन्यप्राण्यांची पाहणी केली. या सदस्यांना तिलारी खोऱ्यात मोडणाऱ्या देवाळे गावच्या जंगलात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय दुर्मीळ असलेल्या ‘मलबार ट्रॉगन’ अर्थात मलबारी कर्ण या पक्ष्याचे दर्शन झाले. पश्चिम घाटामध्ये असलेला हा पक्षी गोवा तसेच कर्नाटकातील गणेशगुडी दांडेली अभयारण्य, केरळ व तमिळनाडू राज्यांच्या सदाहरित जंगलांत आढळतो. दोडामार्ग तालुका हा गोवा व कर्नाटक राज्यांना लागून असल्याने येथील तिलारीच्या जंगलात असे पक्षी सापडतात, अशी माहिती वाईल्ड कोकण या संस्थेचे सचिव डॉ. गणेश मर्गज यांनी दिली. या प्रकारचे दोन पक्षी आढळून आल्याचेही ते म्हणाले. याव्यतिरिक्त याच जंगलात ‘गोल्डन ट्री स्नेक’ म्हणजेच उडता सोनसर्पही आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. वाईल्ड कोकणच्या सदस्यांना अभ्यास दौऱ्यात आढळलेल्या या दुर्मीळ प्रजातीच्या पक्षी व सापामुळे तिलारी खोऱ्यातील जैवविविधता पुन्हा एकदा प्रकर्षाने पुढे आली आहे. पक्षी अभ्यासकांना तिलारी खोऱ्याची साद तिलारी खोऱ्यातील जंगल परिसरात विविध प्रजातींचे दुर्मीळ वन्यजीव सापडतात. शिवाय या ठिकाणी मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे तिलारीचा जंगल परिसर अभ्यासकांसाठी नेहमीच साद घालत आला आहे. या ठिकाणच्या जैवविविधतेवर अभ्यास करण्याची गरज आहे.
तिलारीच्या खोऱ्यात आढळला उडणारा दुर्मीळ ‘साप’
By admin | Updated: October 3, 2015 22:53 IST