वैभव साळकरदोडामार्ग : जैवविविधतेने संपन्न असलेला दोडामार्ग तालुक्याचा निसर्ग आता अभ्यासकांना साद घालत आहे. याच भागात मोडणाऱ्या केर येथील जंगलात ड्रॉसेरा बर्मानी ही दुर्मीळ कीटकभक्षी वनस्पती सापडली आहे. निसर्ग अभ्यासक तुषार देसाई यांना ही वनस्पती आढळून आली असून, तिच्या अस्तित्वामुळे इथली वैभवसंपन्न जैवविविधता अनुभवण्याची संधी अभ्यासकांना चालून आली आहे.आंबोली ते मांगेली चा सह्याद्रीचा पट्टा विविध दुर्मीळ जातींचे पशु-पक्षी, प्राणी आणि वनस्पतींसाठी निसर्ग अभ्यासकांना खुणावत आला आहे. विविध संस्था आणि निसर्ग अभ्यासक इथल्या निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी येत असतात. त्यापैकीच एक असलेल्या वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत आयोजित पक्षी निरीक्षणासाठी फिरत असताना, इथले निसर्ग अभ्यासक तुषार देसाई यांना ही कीटकभक्षी वनस्पती आढळून आली. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, ड्रोसेरा प्रजाती ही एक लुप्तप्राय मांसाहारी वनस्पती असून, या वनस्पतीचा उपयोग हर्बल औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. या वनस्पती स्वत:चे अन्न हरितद्रव्याच्या साहाय्याने तयार करतात, परंतु काही वनस्पतींना पूरक अन्नाची गरज असते आणि ते अन्न काही वनस्पतींना कीटक वा अन्य प्राण्यांना पकडून त्यांच्या शरीरातून मिळवावे लागते. अशा कीटकभक्षक वनस्पतींच्या सुमारे ६२५ जाती असून, त्यांपैकी ३०-३५ जातींच्या वनस्पती भारतात सापडतात. महाराष्ट्रात फक्त पाच-सहा जातींच्या वनस्पती आढळतात. या सर्व वनस्पतींना ‘मांसाहारी वनस्पती’ असेही म्हणतात. या वनस्पती जमिनीवर, पाण्यात किंवा दोन्ही ठिकाणी आढळणाऱ्या असतात; परंतु बहुतेक कीटकभक्षक वनस्पती दलदलीच्या किंवा वाळवंटी भागांत आढळतात. ज्या ठिकाणी थोडाच नायट्रोजन असतो, तेथे त्या वनस्पतींची विशिष्ट प्रकारे वाढ होते.महाराष्ट्रात सापडणाऱ्या कीटकभक्षक वनस्पतींमध्ये ड्रॉसेरा प्रजातीतील वनस्पतींच्या दोन प्रजाती उपलब्ध आहेत. ड्रॉसेरा इंडिका आणि ड्रॉसेरा बर्मानी. तिसरी जात ड्रॉसेरा पेल्टेटा ही महाराष्ट्राबाहेर काही थंड हवेच्या ठिकाणी सापडते. ड्रॉसेरा इंडिका ही पश्चिम घाटात खंडाळा, महाबळेश्वर आदी भागांत ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाहावयास मिळते. ड्रॉसेरा बर्मानी ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भातशेतात पावसाळ्यानंतर सापडते.
केरमधील जंगलात ड्रॉसेरा बर्मानी ही दुर्मीळ प्रजातीतील कीटकभक्षी आढळलेली वनस्पती इथल्या जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या निसर्गाचा एकप्रकारे साक्षीदार आहे आणि या अशा निसर्गरूपी विस्मयकारक गोष्टीचा अनुभव घेऊन त्याचा साक्षीदार मला होता आले, हे मी माझे भाग्य समजतो. - तुषार देसाई, निसर्ग अभ्यासक, केर