रत्नागिरी : हजारो लोक वाहनचालक म्हणून राज्या-राज्यांची सैर करतात. परंतु ते एकदा घरातून निघून प्रवासाला गेल्यावर परत येतीलच याची काहीही खात्री नसते. असाच प्रकार अहमदाबादजवळील मोरबी येथून ट्रकने गोव्याला चाललेल्या ट्रक क्लिनर रामकेर चंदेव यादव (४२, रा. सलेमपूर, मु. ता. मुहमदाबाद, जिल्हा-गाजीपूर, उत्तरप्रदेश) याच्याबाबत घडला असून, किरकोळ आजारावरील उपचार घेतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. मोरबीहून काल गोव्यासाठी ट्रकमध्ये टाइल्स भरून अविनाशकुमार कुबेर यादव (३५, रा. सलेमपूर, उत्तरप्रदेश) हा ट्रक घेऊन महाडपर्यंत आला असता त्याच्यासोबत असलेला क्लिनर अर्थात त्याचा चुलत भाऊ रामकेर यादव याची प्रकृती अचानक बिघडली. त्याच्यासाठी अविनाशाकुमारने औषधे घेतली. बरे वाटल्याने पुढे कुठेतरी दवाखान्यात दाखल होऊन तपासणी करून औषध घेऊया, असे अविनाशकुमारने रामकेरला सांगितले. आज सकाळी ट्रक लांजा येथे आला असता अविनाशकुमारने रामकेरला लांजा रुग्णालयात तपासणीकरिता नेले. तेथे औषधोपचार करण्यात आले. मात्र, त्यानंतर रामकेरची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडली. त्या रुग्णालयातील औषधामुळेच रामकेरचा मृत्यू झाल्याचे अविनाशकुमार यादव हा रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात डॉक्टर्सना सांगत होता. मात्र, लांजा रुग्णालयातील त्याच्या प्रीस्किप्शनवर अल्कोेहोलिक असा शेरा मारण्यात आला होता. आज सायंकाळी त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रामकेर हा मृत असल्याचे घोषित केले. त्यानंतर अविनाशकुमारच्या अश्रूंचा बांध फुटला. रामकेर याचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला असून, पोलिसांना त्याच्या नातेवाइकांच्या येण्याची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)
रामकेरचा जीवनप्रवास वाटेवरच संपला...
By admin | Updated: September 17, 2014 22:23 IST