शोभना कांबळे- रत्नागिरी -दरवर्षी ११ जुलै हा जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. यानिमित्त लोकसंख्या वाढीच्या गांभीर्याबाबत चर्चा व्हावी, हा उद्देश असतो. तशी चर्चाही होते. मात्र, जन्म आणि मृत्यूदर यातील तफावतीमुळे लोकसंख्या वाढ होतेच आहे. त्यामुळे ही वाढती लोकसंख्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या मनुष्य जीवनातील अनेक समस्यांना कारणीभूत ठरत आहे.दिवसेंदिवस लोकसंख्येचा भस्मासूर वाढत आहे. दरवर्षी अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉईड यांसारख्या रोगाने हजारो लोक आजारी पडतात. वाढते शहरीकरण, कारखानदारी, प्रचंड प्रमाणात वाढणारी वाहने यांनी प्रदूषणाच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. घरे, अन्नधान्याचा पुरवठा या समस्या वाढू लागल्या आहेत. या साऱ्यांच्या मुळाशी अफाट वाढणारी लोकसंख्या हेच कारण आहे. लोकसंख्या वाढीस अंधश्रध्दा हेही एक प्रमुख कारण मानले जाते. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, अशी भ्रामक कल्पना अगदी सुशिक्षित कुटुंबांमध्ये आजही आहे. या अंधश्रध्देमागेही अज्ञान, निरक्षरता आणि दारिद्र्य ही कारणे आहेत. प्रामुख्याने ज्या कुटुंबांमध्ये महिला अशिक्षित आहेत, अशा ठिकाणी लोकसंख्या वाढीची बीजे अधिक दिसतात. आपली सामाजिक रचनाही लोकसंख्या वाढीचे एक कारण आहे. १९५१पासून शासनाने लोकसंख्या नियंत्रणाची अनेक धोरणे आखलीे आहेत. लोकसंख्या वाढीसाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले असले तरी ते अपुरे आहेत. माता-बाल संगोपन कार्यक्रमाचे यश, लसीकरण, संसर्गजन्य आजारावर सुयोग्य उपचार आणि निंयंत्रण, मुला - मुलींच्या शिक्षणात वाढ, वाढलेली आयुमर्यादा, त्यामुळे बदललेला दृष्टीकोन याबरोबरच आरोग्य क्षेत्रातील प्रगतीमुळे रोगांवर केलेली मात तसेच उच्च दर्जाची प्रतीजैविके यांचा वापर, आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम जागतिक निधीव्दारे सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. लोकांमध्ये विविध माध्यमांव्दारे जनजागृती होत आहे. यामुळे मृत्यूदर कमी झाला आहे, तरी जन्मदर त्याप्रमाणात कमी झालेला नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढतच आहे. त्यासाठी सामाजिक स्तरावरही प्रबोधन होणे गरजेचे आहे. काही सामाजिक संस्था आरोग्य विभागाला सहकार्य करत आहेत, हेही महत्त्वाचे आहे.यावर्षी या जागतिक लोकसंख्या दिनाचे घोषवाक्य ‘खुशाली का आधार छोटा परिवार’ असा आहे. यासाठी शासनाने प्रस्तावित केलेल्या उपाययोजनेमध्ये छोटे कुटुंब संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला आहे. यासाठी छोटे कुटुंब (२ जिवंत अपत्य) संकल्पना अवलंबिणाऱ्या जोडप्यांना अनेक योजनांचा लाभ दिला जाणार आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी सर्वप्रथम साक्षरतेवर भर द्यावा लागणार आहे. त्यायोगे दारिद्र्य हटविण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यावसायिक शिक्षण, स्त्री शिक्षण यांच्यावर भर देऊन स्त्री स्वयंनिर्भर करणे, काळाची गरज आहे. जेणेकरून कुटुंबातील स्त्रीचे स्थान उंचावेल व कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत तिला सहभाग मिळेल.धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरापासून ते गाव पातळीपर्यंत महिलांचा सक्रिय सहभाग मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यस्तरावर महिलांचा समावेश असलेली राज्य लोकसंख्या परिषद स्थापन करण्यांत आलेली आहे कुटुंबकल्याण म्हणजे केवळ संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया ही संकल्पना बदलून प्रसूतीपूर्व, प्रसूती काळातील व प्रसुतीपश्चात सेवा, बाल्यावस्था, पौंगडावस्था, तारूण्य, चाळीशीनंतरचेआरोग्य, लैंगिंक शिक्षण, मुला-मुलींच्या लग्नाचे योग्य वय, कुटुंबामध्ये पुरूषांचा सहभाग, लैंगिक आजार अशा व्यापक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे प्रजनन आरोग्य व बाल आरोग्य हा कार्यक्रम सर्वव्यापक बनला आहे. त्यामुळे निरोगी पिढी घडण्यास मदत होत आहे.छोटे कुटुंब संकल्पना राबवण्यासाठी शासनाकडून अनेक योजना प्रस्तावित आहेत.सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील एखाद्या विवाहीत जोडप्याने एकच अपत्य (मुलगी) असताना किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर (मुलगा नसताना) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली असेल, तर त्या मुलींच्या नावे प्रत्येकी ५००० रूपयांची १८ वर्षांची मुदतठेव देण्यात देण्यांत येईल.रत्नागिरी जिल्ह्यातील जन्मदर आणि मृत्यु दर यांचे प्रमाण (हजारी)दर२००५२०१०२०१४जन्मदर१८.९१७.८१२.३मृत्युदर ११.४१०.१७.१बालमृत्यु३८३१२७मातामृत्यु०.४२०.२७०.२३
जन्म आणि मृत्युदरातील तफावतीमुळे लोकसंख्येत वाढ
By admin | Updated: July 10, 2015 23:55 IST