निकेत पावसकर, लोकमत न्यूज नेटवर्क, तळेरे (जि. सिंधुदुर्ग) : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असलेले गाव पोंभुर्ले (ता. देवगड) हे अद्यापही शासनाकडून दुर्लक्षितच आहे. पुस्तकांचे गाव करण्याची घोषणा हवेतच विरली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीतर्फे येथे उभारलेल्या जांभेकरांच्या स्मारकाचा प्राधान्याने विकास करून आदर्श गाव म्हणून विकास करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सद्यस्थितीत येथील स्मारक प्रकल्पात ‘दर्पण’ सभागृह, बाळशास्त्रींचा अर्धपुतळा, बाळशास्त्रींच्या कार्यकर्तृत्वाची माहिती सांगणारे डिजिटल फलक आदींचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांच्या पुढाकारातून प्रतिवर्षी या ठिकाणी ६ जानेवारी राज्यस्तरीय पत्रकार दिन, दर्पण पुरस्कार वितरण, २० फेब्रुवारी रोजी बाळशास्त्रींची जयंती, १७ मे रोजी पुण्यतिथी साजरी केली जाते.
उद्या दर्पण दिन
- बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी वृत्तपत्रसृष्टीची पायाभरणी केली. त्यामुळे ६ जानेवारी हा दिवस दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो.- कोकणच्या मातीतला सुपुत्र १८२५ मध्ये मुंबईत गेला तिथे जाऊन आपल्या विद्वत्तेच्या जोरावर शिक्षण, सामाजिक, विज्ञान, पुरातत्त्व संशोधन, धर्मचिकित्सा आणि पत्रकारितेतून समाज जागरण अशा बहुआयामी कर्तृत्वाची छाप उमटवण्यात ते यशस्वी ठरले.- २० फेब्रुवारी १८१२ रोजी पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथे जन्मलेल्या बाळशास्त्री जांभेकरांना अवघ्या ३४ वर्षांचे अल्पायुष्य लाभले.
बाळशास्त्री जांभेकरांचे समग्र चरित्र तीन खंडांमध्ये लिहून राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडे सुपुर्द केले आहे. लवकरच त्याचे प्रकाशन होणार आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने उभारलेल्या स्मारकाचा यापुढे अधिक विकास करून राज्य शासनाने पोंभुर्ले आदर्श गाव म्हणून विकसित करावे. तसेच त्यांची कर्मभूमी असलेल्या मुंबईमध्ये स्मारक उभे करावे.- रवींद्र बेडकिहाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी