सिंधुदुर्गनगरी : शासन निर्णय, परिपत्रके तसेच सभेचे अजेंडा, महत्वाची माहिती जिल्हा परिषद सदस्यांना तत्काळ देता यावी, प्रशासकीय कामकाजात गती यावी यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून जिल्हा परिषद सदस्यांना ‘टॅब’ देण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषद विषय समिती सभांमध्ये सदस्यांकडून सभेचा अजेंडा पोचला नाही, शासन निर्णय तसेच आवश्यक माहिती मिळत नसल्याचे वारंवार सांगण्यात येत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाची जिल्हा परिषद सदस्यांना ‘टॅब’ पुरविण्याची योजना कोलमडली असून लाखो रुपये निधी वाया गेला आहे.जिल्हा प्रशासनाने प्रशासनात गतिमानता यावी, शासनाच्या सर्व योजनांची माहिती, त्यामध्ये होणारे बदल आणि नवीन निकष याबाबत सदस्यांना तत्काळ माहिती मिळावी म्हणून सन २०१२-१३ मध्ये जिल्हा परिषद स्वनिधीतून सर्व सदस्यांना ‘टॅब’ पुरविण्याची योजना अंमलात आणली. यासाठी लाखो रुपये खर्चही करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेस प्राप्त होणारे शासन निर्णय, परिपत्रके, सभेचा अजेंडा आणि महत्वाची माहिती जिल्हा परिषद सदस्यांना तत्काळ देता यावी यासाठी ही महत्वपूर्ण योजना राबविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात या ‘टॅब’चा वापर संबंधित सदस्यांकडून होताना दिसत नाही. जिल्हा परिषद स्वनिधीतील लाखो रुपये खर्चून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी ‘टॅब’ची योजना राबविण्यात आली असली तरीही सदस्यांकडून वारंवार आपल्याला समिती सभांचा अजेंडा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. तर यामुळे विविध सभांमध्ये वादही वाढू लागले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने ज्या उद्देशाने ‘टॅब’ची योजना राबविली ती सफल झाल्याचे दिसून येत नाही. या योजनेवरील लाखो रुपये निधीही वाया गेला आहे. (प्रतिनिधी)
‘टॅब’ पुरविण्याची योजना कोलमडली
By admin | Updated: December 1, 2014 00:23 IST