रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेने पथदिव्यांच्या विजेचे बिल न भरल्याने महावितरणने सोमवारी सायंकाळी शहरातील खालची आळी, मिरकरवाडासह ५ ठिकाणच्या पथदिव्यांची वीज जोडणी कापली. त्यामुळे शहराच्या निम्म्या भागातील पथदीप सोमवारी रात्री बंद होते. मात्र, पालिकेकडे शहरातील पाच भागांतील पथदिव्यांची वीजबिले पालिकेकडे आलीच नाहीत तर ती भरणार कशी, असा सवाल नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी केला आहे. माहिती न घेता वीजपुरवठा खंडित केल्याने नगराध्यक्ष मयेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणला पालिकेकडून पाणी पुरवठा होतो. त्याचे हजारोंचे बिल महावितरणकडे थकीत आहे. खरेतर याआधीच त्यांचा पाणीपुरवठा खंडित करायला हवा होता, अशी आक्रमक भूमिका नगराध्यक्ष मयेकर यांनी घेतली. तसेच थकीत पाणीपट्टीमुळे महावितरणचा पाणीपुरवठा खंडित करण्यास कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी पाठविल्याचेही मयेकर यांनी सांगितले. त्यामुळे महावितरण व रत्नागिरी पालिका आमने-सामने आले असून, हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरी शहरात ४ हजार पथदिवे आहेत. त्यासाठी दर महिन्याला पालिका ८ ते १० लाखांचे वीजबिल भरणा करते. शहरातील पाच विभागातील वीजबिलेच पालिकेला प्राप्त झालेली नाहीत. त्याच भागातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केला आहे. माहिती न घेता कृती करणे ही महावितरणची घिसाडघाईच असल्याचे मयेकर म्हणाले. पालिका विद्युत विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात ४ हजार पथदिव्यपांपैकी २५०० पथदिवे हे सोडियम व्हेपर्सचे आहेत. त्यामध्ये १५०० व्हेपर्स १५० वॅट क्षमतेचे, तर १००० व्हेपर्स हे २५० वॅट क्षमतेचे आहेत. १५०० पथदीप हे ट्युबलाईट स्वरुपातील असून, ४० वॅटच्या ट्यूबलाइट वापरण्यात आल्या आहेत. पथदिव्यांचे अनेक विभाग शहरात करण्यात आले असून, त्यातील पाच विभागांची वीजबिले पालिकेला मिळालेली नाहीत. (प्रतिनिधी)
पथदीपांचा वीजपुरवठा खंडित
By admin | Updated: December 2, 2014 23:36 IST