सिंधुदुर्गनगरी : खरीप हंगामासाठी सुधारीत व संकरीत भातबियाणांची ५ हजार ६५३ क्विंटलची मागणी करण्यात आली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातबियाणे उपलब्ध होणार आहे. तसेच गेल्या आर्थिक वर्षात वणवा लागून नुकसान झालेल्या २५ जणांना अडीच लाख रूपयांची नुकसान भरपाई दिल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली.जिल्हा परिषद कृषी समितीची तहकूब सभा उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात मंगळवारी झाली. यावेळी सदस्य विभावरी खोत, योगिता परब, समिती सचिव एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. यावर्षी खरीप हंगामासाठी महाबीजकडून २३५५ क्विंटल सुधारीत बियाणे व २५५ क्विंटल संकरीत बियाणे तर खासगी कृषी सेवा केंद्रामार्फत २८१० क्विंटल सुधारीत बियाणे तर २३८ क्विंटल संकरीत बियाणे असे एकूण ५६५३ क्विंटल भाताची मागणी करण्यात आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भातबियाणे जिल्ह्यात दाखल होणार असून ते विक्रीस ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सभागृहात देण्यात आली.वणवा लागल्याने काजू, आंबा बागा जळून बेचिराख होतात. त्या संबंधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा प्रस्ताव कृषी समिती सभेत ठेवण्यात आला होता. त्यानुसार २६ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून त्यांना नुकसानीपोटी अडीच लाख रूपये देण्यात येणार आहेत.लहान शेतकऱ्यांना आपल्या परसबागेत भाजीपाला लागवडीसाठी पाणी सिंचन सुविधा मिळावी म्हणून एक अश्वशक्तीचे ६० पंप मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच या शेतकऱ्यांसाठी ७५ टक्के अनुदानावर शेडनेट देण्याची योजना बनविण्यात आल्याचे यावेळी देसाई यांनी सांगितले.मार्केटींग फेडरेशनने खरेदी केलेल्या २३ हजार ९९८ क्विंटल भाताची उचल न झाल्याने यावर्षी खतासाठी गोडावून उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे. यावर हे भात खरेदी व्हावे यासाठीची निविदा प्रक्रिया करण्यात आली असून लवकरच त्याची उचल करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.यावर्षी पाच लाख रूपये खतासाठी तरतूद करण्यात आली आहे. कलमी रोपे बियाणे यासाठी ५० टक्के अनुदानावर प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
मे महिन्यात उपलब्ध होणार भातबियाणे
By admin | Updated: April 23, 2015 00:34 IST