अजित दळवी
बांदा : नेतर्डे परिसरात गेली चार दिवस धुमाकूळ घालत असलेल्या ओंकार हत्तीने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील पत्रादेवी येथील सीमा तपासणी नाक्यानजीक हजेरी लावली. त्यामुळे गोवा महामार्ग व परिसरात एकच गोंधळ उडाला. तत्पूर्वी रात्री हत्तीने फकीरफाटा येथील मराठी शाळेच्या आवारात बस्तान मांडत तेथील केळी बागेची नासधूस केली. हत्तीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने वनविभागाच्या पथकाला गर्दीवर नियंत्रण मिळविताना नाकीनऊ आले. आज, मंगळवारी दुपारी ओंकार हत्ती –तोरशे पेट्रोल पंप गोवा हद्दीत असल्याचे वन खात्याकडून सांगण्यात आले. काल दिवसभर ओंकारचा वावर नेतर्डे डोंगरपाल डिंगणे परिसरात होता. रात्री तो येथील गोवा फकीर फाटा शाळेच्या आवारात दाखल झाला. तब्बल दोन तास त्याचा याठिकाणी वावर होता. त्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. बांदा डिंगणे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यरात्री त्याने मुंबई गोवा महामार्ग गाठत पत्रादेवी तपासणी नाका पार केला. याठिकाणी असलेल्या वनखात्याच्या चौकीजवळील जंगलात त्याचा वावर आहे. सिंधुदुर्ग व गोवा वनखात्याचे पथक त्याच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. दोडामार्ग आणि तिलारी परिसरातून आलेला “ओंकार” हत्ती आता बांदा- नेतर्डे भागात शनिवारी (दि.१३) पोहोचला होता. नेतर्डे-धनगरवाडी येथील पाणवठ्याजवळ हा हत्ती स्थिरावल्याची होता. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह जलद कृती दलाचे जवान हत्तीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. गेल्या काही दिवसांपासून दोडामार्गच्या घोटगे आणि मोर्ले परिसरात वावर असलेला हा हत्ती कळणे, उगाडे, डेगवे मार्गे डोंगरपाल भागात आला आणि त्यानंतर नेतर्डे परिसरात स्थिरावला होता. वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.