सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेने या निवडणुकीत मोठे यश संपादन केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मात्र एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. या निकालांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीचे स्थान अधिक बळकट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या जागांपैकी दोन जागांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला असून, शिंदेसेना आणि शहर विकास आघाडीने प्रत्येकी एका जागेवर बाजी मारली आहे. निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली. विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
"निवडणुका आता संपल्या आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सर्व विजयी उमेदवारांना शब्द देतो की, शहराच्या विकासाच्या मागण्या पूर्ण करताना कोणताही पक्षपात केला जाणार नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य दिले जाईल. कणकवलीमध्ये भाजपचे समीर नलावडे यांचा पराभव करून शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी झाले असले, तरी त्यांच्याही विकासकामांना सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल", अशी हमी राणेंनी यावेळी दिली.
महाविकास आघाडीचा भोपळा
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पदरी मोठी निराशा पडली. जिल्ह्यातील चारही महत्त्वाच्या जागांवर महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला असून, राणे समर्थकांनी जिल्ह्यावर आपली पकड पुन्हा एकदा घट्ट असल्याचे दाखवून दिले आहे.
Web Summary : BJP, Shinde Sena dominate Sindhudurg local elections, defeating Maha Vikas Aghadi. Nitesh Rane pledges development for all, regardless of party affiliation. MVA faces major defeat.
Web Summary : सिंधुदुर्ग स्थानीय चुनावों में बीजेपी, शिंदे सेना का दबदबा, महा विकास अघाड़ी को हराया। नीतेश राणे ने पार्टी संबद्धता की परवाह किए बिना सभी के लिए विकास का वादा किया। एमवीए को भारी हार का सामना करना पड़ा।