Nine in Sindhudurg want to contest from BJP! | भाजपकडून निवडणूक लढविण्यास सिंधुदुर्गातील नऊ जण इच्छूक !

भाजपकडून निवडणूक लढविण्यास सिंधुदुर्गातील नऊ जण इच्छूक !

ठळक मुद्देप्रमोद जठार यांची माहिती स्वाभिमान पक्ष विलीनीकरणाचा निर्णय वरिष्ठ स्तरावरूनच

कणकवली : भाजप हा घरणेशाहिवर चालणारा पक्ष नाही. सिंधुदुर्गातूनविधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या नऊ जणांचा मान ठेवण्यासाठी जिल्हा कोअर समितीसमोर आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येईल. त्यानंतर उमेदवारी बाबत निर्णय घेतला जाईल.

नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणाबाबतचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतला जाईल. पक्षाच्या त्या निर्णयाला आम्ही सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बांधील असू ,अशी भूमिका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे जाहीर केली.

कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप वाहतुक शाखा आघाडी जिल्हाध्यक्ष शिशिर परुळेकर, बबलू सावंत, समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रमोद जठार म्हणाले, कुडाळ येथे ३० ऑगस्ट रोजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील इच्छूक उमेदवारांची विविधांगी माहिती घेण्यात आली.

यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघातून संदेश पारकर, अतुल रावराणे, प्रमोद रावराणे , कुडाळ मतदारसंघातून अतुल काळसेकर, बाबा मोंडकर तर सावंतवाडी मतदार संघातून राजेंद्र म्हापसेकर, राजन तेली, स्मिता आठलेकर, स्नेहा कुबल यांनी उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे सांगितले. त्याबाबतचा अहवाल आमदार हळवणकर हे प्रदेशाध्यक्ष तसेच वरिष्ठांकडे देतील . त्यानंतर उमेदवारीचा निर्णय होईल .

या बैठकीच्यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षातून भाजप मध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्याबाबत आपली मते मांडली. त्यातील काही सकारात्मक तर काही नकारात्मक होती. पदाधिकाऱ्यांच्या भावना ऐकून घेण्यात आल्या असून त्याही वरिष्ठ स्तरावर मांडल्या जाणार आहेत.

आवश्यकता भासल्यास रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेणार आहे. पक्षहीताच्या दृष्टीने तसेच पक्ष वाढीसाठी वरिष्ठांकडून जो निर्णय घेतला जाईल त्याच्याशी माझ्यासह सर्व पदाधिकारी बांधील राहणार आहेत.

मात्र, सध्याच्या राजकीय घडामोडी बघता नारायण राणे यांचा भाजप प्रवेश हा शिवसेनेच्या भूमिकेशी संबधित आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप युती कायम राहिली तर त्यांचा प्रवेश कठीण आहे.

विधानसभा निवडणूक जागा वाटपाच्या मुद्यावरून युती तुटली तर पक्षप्रवेशाचा विचार होऊ शकतो. असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला ज्या पदाधिकाऱ्यांचा विरोध असेल त्यांनी वैयक्तिकरित्या तो पक्ष श्रेष्ठींकडे मांडावा. भाजप मध्ये लोकशाही आहे. त्यामुळे त्यांचे मत ऐकून घेतले जाईल. मी जिल्हाध्यक्ष असल्याने माझी मते पक्षाशी बांधील असणार आहेत. असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.

मी इच्छूक नाही !

सिंधुदुर्गातील तिन्ही विधानसभा मतदार संघातून स्वबळावर निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे. जिल्ह्यातून तिन्ही भाजपचे आमदार निवडून आले तर जिल्हाध्यक्ष म्हणून माझेच श्रेय असणार आहे. पण , कणकवली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास मी इच्छूक नाही. अशी भूमिकाही प्रमोद जठार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.

कोकणातील घरे कायमस्वरूपी उघडी रहावी !

कोकणातील अनेक व्यक्ती कामधंद्या निमित्त मुंबई तसेच बाहेर गावी राहतात. त्यामुळे त्यांची घरे बंद असतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ते गावी आल्याने ही घरे उघडली आहेत. त्यामुळे कोकणात मोठया प्रमाणात रोजगार निर्माण होऊन येथील व्यक्तीना येथेच रोजगार उपलब्ध व्हावा. तसेच बंद असलेली येथील घरे कायमस्वरूपी उघडी राहावीत अशी प्रार्थना आपण गणराया जवळ करतो. असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.

Web Title: Nine in Sindhudurg want to contest from BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.