कणकवली : उद्योगमंत्री नारायण राणे यांना माझी क्षमता काय आहे हे चांगलेच माहित आहे. लोकांची दिशाभूल करणे हाच त्यांचा उद्योग आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी माझ्या क्षमतेची काळजी करू नये, असा टोला आमदार विजय सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकातून लगावला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साखर कारखान्याच्या खात्यावर फक्त १ कोटी रुपयेच जमा आहेत असे नारायण राणे म्हणतात. बँकेत पैसे साठविण्यापेक्षा इमानदारीने धंदा करून जो जास्त पैसे कमवितो तोच खरा व्यावसायिक असतो. माझ्यापेक्षाही राणे यांच्याकडे अब्जावधी रुपये आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना काम देण्याकरीता आतापर्यंत राणे यांनी का प्रयत्न केला नाही याचे उत्तर सिंधुदुर्गातील जनतेला द्यावे. जिल्ह्याचा तसेच शेतकऱ्यांचा विकास होऊ नये व तरुणांना रोजगार मिळू नये यासाठी नारायण राणे गेली तीन वर्षे आमच्या कारखान्याच्या विरोधात भांडत आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी साखर कारखान्याचे काम करीत आहे असे म्हणणे चुकीचे व हास्यास्पद आहे. राणे यांना कावीळ झालेली आहे. त्यामुळे त्यांना सगळे पिवळे दिसत आहे. १९९० पासून आतापर्यंत सिंधुदुर्गातील जनतेच्या मतावरती राजकारण करून फक्त स्वत:चा व कुटुंबियांचाच फायदा त्यांनी करून घेतला आहे. माझ्या गावची ग्रामपंचायत ही काँग्रेसचीच आहे. त्यामुळे गावातील निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या लोकांना मी कधीही विरोध केलेला नाही. माझा विरोध काँग्रेसला नसून एका विक्षिप्त प्रवृत्तीला आहे, असेही सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)
लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग
By admin | Updated: September 15, 2014 23:20 IST