वैभववाडी : केंद्र्रात आणि राज्यात सत्तेवर येऊन वर्ष झाले तरी निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन शिवसेना- भाजप पूर्ण करु शकलेले नाहीत. नगरपंचायतीचा युतीचा प्रचारही फसवा आणि दिशाभूल करणारा आहे. त्यामुळे वैभववाडीच्या जनतेने युतीच्या प्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत केले. वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीचा काँग्रेसने शपथनामा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते बुधवारी दुपारी प्रसिद्ध केला. यावेळी आमदार नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, सभापती वैशाली रावराणे, उपसभापती शोभा पांचाळ, दिलीप रावराणे, नासीर काझी, अशोक सावंत, अंबाजी हुंबे, आदी उपस्थित होते. नारायण राणे म्हणाले, केंद्र्र सरकार महागाई कमी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे राज्यातील निवडणुकीच्या प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप करुन पुन्हा जनतेची दिशाभूल करीत आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. महागाई कमी करण्याची केद्र्र व राज्य सरकारची इच्छा नाही. सरकारला डाळीच्या साठेबाजांवर कारवाईच करायची होती तर तुरडाळ २00 रुपयांवर जाण्याची वाट का पाहण्यात आली? असा सवाल उपस्थित करताना नारायण राणे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. (प्रतिनिधी)मत विकू नका, पावित्र्य जपा : नारायण राणेंचे आवाहनराणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, जे केसरकर आपल्या मतदारसंघात दहा वर्षात काहीच करु शकले नाहीत. ते वैभववाडीत काय करणार? असा सवाल करीत ते पालकमंत्री झाले कधी? आणि वैभववाडीच्या प्रशासकीय इमारतींना मंजुरी मिळाली तेव्हा राज्यात सत्ता कोणाची होती. हे त्यांना माहीत आहे का? वैभववाडीचा विकास नीतेश राणेच करु शकतात. निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर आमचा अंकुश राहिल असे त्यांनी स्पष्ट केले.लोकशाहीत मत विकणे हा गुन्हा आहे. मताची किंमत करता येत नाही. मत विकले तर लोकप्रतिनिधीवर आपला हक्क राहत नाही. त्यामुळे वैभववाडीच्या जनतेने नगरपंचायतीच्या निवडणुकीत पैसे घेऊन मते न विकता प्रामाणिकपणे मतदान करुन मतदानाचे पावित्र्य जपावे, असे आवाहन काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे.
युतीचा प्रचार दिशाभूल करणारा
By admin | Updated: October 29, 2015 00:08 IST