असगोली : मराठी भाषा व साहित्य यांची सर्वांगीण प्रगती आणि विकासासाठी कार्यरत असणाऱ्या तसेच मराठी कवी व साहित्यिकांच्या हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या गुहागर शाखेच्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.दि. २९ व ३० नोव्हेंबर रोजी भंडारी भवन, गुहागर येथे होणाऱ्या या साहित्य संमेलनातून गुहागरातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीला अधिकाधिक चालना देण्याचा संयोजकांचा मानस आहे. त्याच धर्तीवर या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर गुहागर बाजारपेठेत होणार आहे.जिल्हास्तरीय साहित्य संमेलनात महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक व कवी प्रा. अशोक बागवे (मुंबई), कवी इंद्रजीत भालेराव (परभणी), भास्कर बढे (बीड), श्रीराम दुर्गे (चिपळूण), दादा मडकईकर (सिंधुदुर्ग) कवी राष्ट्रपाल सावंत (चिपळूण), कैलास गांधी (दापोली) अनेक प्रख्यात साहित्यिकांचा सहभाग लाभणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात पर्यावरण व ग्रंथदिंडी, शोभायात्रा, उद्घाटन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलांचे लोककलावंतांकडून सादरीकरण व त्यांचा सन्मान, परिसंवाद, कथाकथन, ग्रंथप्रदर्शन आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक - युवतींसाठी शिक्षक व साहित्य प्रेमींसाठी विशेष कार्यक्रमांचा भर असणार आहे.संमेलन गुहागरचा मानबिंदू ठरावा, यासाठी संयोजन समिती प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, गुहागरचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर, उपाध्यक्ष बाबासाहेब राशिनकर, प्रा. मनाली बावधनकर, कार्यवाह ईश्वरचंद्र हलगरे, सहकार्यवाह ज्ञानेश्वर झगडे, खजिनदार प्रा. महावीर थरकार, कार्यकारी सदस्य संजय गमरे, सल्लागार अॅड. संकेत साळवी यांनी केले आहे. (वार्ताहर)महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संमेलनामुळे गुहागर येथील साहित्य चळवळीला उजाळा मिळणार.संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे गठन.नामवंत कवींचा सहभाग.तयारीला लागले गुहागरकर.विद्यार्थी, युवावर्गासाठी विशेष कार्यक्रम.
गुहागरात मसापचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन
By admin | Updated: September 24, 2014 00:08 IST