सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुस्लिम बांधवांचे रमजान महिन्याचे रोजे आणि रमजान ईद (ईद-उल-फित्र) तसेच हिंदू बांधवांचे नागपंचमी व श्रावण महिन्यातील उत्सवाचे सर्व कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ जुलैपासून ५ आॅगस्टपर्यंत १५ दिवसांसाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.जिल्ह्यातील वरील कालावधीत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या कालावधीत जिल्हा दंडाधिकारी ई. रविंद्रन यांनी प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१) आणि (३) अन्वये २२ जुलै ते ५ आॅगस्ट पर्यंतच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई केली आहे.या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणे, ज्यामुळे सभ्यता अगर निती यास धक्का पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलटून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येईल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे अगर हावभाव करणे अगर सोंग आणणे अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्याचा लोकात प्रसार करणे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे, हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपर्निदीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे अशा व्यक्तींना आणि लग्न आदी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यास लागू पडणार नाही.मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधीकृत केलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यास राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो शिक्षेस पात्र राहील. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गात मनाई आदेश जारी
By admin | Updated: July 23, 2014 21:55 IST