मिलिंद पारकर - कणकवली --दिवाळी हा खरेतर प्रकाशाचा, रोषणाईचा सण समजला जातो. मात्र, सिंधुदुर्गात गणेशोत्सवातच दिवाळीसारखी रोषणाई केली जाते. विविध प्रकारच्या लाईटस् बाजारात दाखल झाल्या असून चोखंदळपणे त्याची खरेदी केली जात आहे. रविवारी कणकवलीत लाईटस् खरेदीसाठी गर्दी दिसून आली. गणेशोत्सवासाठी रोषणाई हौसेने केली जाते. ज्या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा असते. त्यादिवशी तर विशेष मेहनत घेऊन रोषणाई केली जाते. गणपती शेजारच्या देखाव्यांसाठी आपले कौशल्य वापरून युवा वर्गाकडून आकर्षकता आणली जाते. सध्या बाजारात भिंतीवर वेगवेगळी चित्रे उमटवणारे लेझर लाईटस्, एलईडी, स्पॉट लाईटस् यांची चलती आहे. एलईडी बल्बस् वापरून तयार करण्यात आलेले विविध रंगी फोकस सहाशेपासून साडे चार हजार रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. एलईडी स्पॉट लाईटस् ८० रूपयांपासून ५०० रूपयांपर्यंत मिळत आहेत. कमी वीज वापरणाऱ्या सीएफएल बल्बस्ना पसंती दिली जात आहे. रंगीबेरंगी आकृत्या उमटवणारे लेझर लाईटस् आठशे ते पंधराशे रूपयांपर्यंत उपलब्ध आहेत. देखाव्यांसाठी चायनीज मोटरही बाजारात आल्या आहेत. या मोटर्स वापरून कारंजे, धबधब्यांचे देखावे साकारले जाऊ शकतात. गणेशमूर्तीवर लावण्यासाठी वीजेवरील फिरत्या छत्र्या ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. आताच्या फिरत्या लाईटच्या माळा येण्यापूर्वी एक-एक लाईटस् जोडून वायर विणून रनिंग लाईटस् माळा तयार केल्या जायच्या. आता या रनिंग लाईटस्मध्ये चायनीज आयटम्सनी शिरकाव केला आहे. रनिंग लाईटस्चे विविध प्रकार चायनीज आयटम्समध्ये मिळतात. अर्थातच देशी माळांपेक्षा हे चायनीज रनिंग लाईटस् माळा स्वस्त पडतात. त्यामुळे देशी कारागीरांचा रोजगार हिरावला आहे. हे कारागीर आता स्वत: रनिंग लाईटस् तयार न करता स्वस्ता मिळणाऱ्या चायनीज माळा घेऊन दारोदार विकतात. गेली दहा-बारा वर्षे चायनीज लाईटस्नी बाजारपेठेवर आपला दबदबा ठेवला आहे. या वस्तू स्वस्त मिळत असल्याने ग्राहकांचा ओढा या वस्तूंकडे जास्त असतो. देशी वस्तू तुलनेने महाग मिळतात. मात्र, चायनीज मालापेक्षा देशी मालात दर्जा आणि टिकावूपणा जास्त आहे. तीन वॅटचा एलईडी बल्ब चायनीज आठ वॅटच्या बल्बपेक्षा जास्त प्रकाश देतो आणि त्याला दोन वर्षांची वॉरंटीही मिळते. मात्र, तो चायनीज बल्बपेक्षा जवळपास दुपटीने विकला जात असल्याने ग्राहक एलईडी बल्ब घेण्याकडे वळत आहेत.- राजू आजगांवकर, गजानन इलेक्ट्रीकल्स
कणकवलीत लेझर, एलईडी लाईटची रोषणाई
By admin | Updated: August 24, 2014 22:33 IST