वैभववाडी : करुळ घाटात रविवार, २७ तारखेस रात्री दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तासभरासाठी ठप्प झाली होती. जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवल्यानंतर तासाभरात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली, आणि तब्बल २० तासांनी दुहेरी वाहतूक पुन्हा पुर्ववत झाली.तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता, त्याचा जोर रविवारीही कायम होता. करुळ आणि भुईबावडा घाट परिसरातील जोरदार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोठी दरड कोसळली. मोठ्या दगडांसह दगडमातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला, ज्यामुळे रस्त्याचा बहुतांश भाग मातीच्या ढिगाऱ्याने व्यापला गेला. परिणामी, महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि शेकडो वाहने घाटमार्गात अडकली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.दरडीची माहिती मिळाल्यानंतर, पोलीसांनी वाहतूक भुईबावडा आणि फोंडाघाट मार्गे वळवली. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू केले. तासभरात दरडीचा काही भाग हटवण्यात यश आले. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली. दरडीचा उर्वरित भाग हटवण्याचे काम सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता पूर्ण झाले आणि त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरु झाली.
Sindhudurg: करुळ घाटात दरड कोसळली; २० तासांनंतर दुहेरी वाहतूक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 17:27 IST