वैभववाडी (सिंधुदुर्ग): सतत कोसळणाऱ्या पावसामुळे करुळ घाटात आज, गुरुवारी (ता.४) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घाटात मोठी दरड कोसळली. त्यामुळे संपूर्ण मार्ग बंद झाला असून या मार्गावरील वाहतूक भुईबावडा तसेच फोंडा घाटमार्गे वळविण्यात आली आहे.दरड हटविण्यास सुरुवात केली असून दरडीमध्ये मोठे दगड असल्यामुळे दिवसभर करुळ घाटमार्ग बंद राहणार आहे. दरम्यान, परतीच्या प्रवासात असलेल्या गणेशभक्तांना या दरडीचा फटका बसला.आठवडाभरापासून तालुक्यात पाऊस सुरु आहे. घाट परिसरात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. या पावसाचा फटका करुळ घाटाला बसला. घाटाच्या माथ्यावरील कड्याचा मोठा भाग सकाळी रस्त्यावर कोसळला. त्यामुळे जवळपास ५०-६० फूट रस्ता कोसळलेल्या दरडीने व्यापला आहे.दरडीच्या ढीगाऱ्यामध्ये मोठ्या दगडाचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते ब्रेकरने फोडावे लागत आहेत. शिवाय घाटात दाट धुकेही आहे. त्यामुळे मोठे दगड फोडण्यात बराच वेळ जाणार असल्याने सायंकाळी उशिरा करुळ घाटमार्गाने वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे.
Sindhudurg: करुळ घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प; परतीच्या प्रवासातील गणेशभक्तांना बसला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:40 IST