रत्नागिरी : तटरक्षक दलाच्या ताब्यात असलेल्या रत्नागिरी विमानतळाचे विस्तारीरकरण होत असून, त्यावरून खासगी विमानसेवा सुरू केली जाणार आहे. रत्नागिरीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. रत्नागिरीच्या सर्वांगिण विकासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. रत्नागिरी विमानतळावरील तात्पुरत्या स्वरुपातील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाचे (एटीएस) उद्घाटन खासदार राऊत यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, तटरक्षक दलाचे कमांडंट एस. एम. सिंग, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, आमदार उदय सामंत, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, शहर उपप्रमुख प्रशांत साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळाच्या विस्ताराचे काम सुरू झाले आहे. विमानतळावर धावपट्टीची लांबी वाढवली जाणार आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहतूक करणारी किमान ५ विमाने उभी करता येतील, असा तळ उभारला जाणार आहे. वाहनतळ, उपयुक्त सेवाही दिल्या जाणार आहेत. शहरापासून हा विमानतळ जवळ आहे. तसेच रत्नागिरीत अनेक पर्यटनस्थळेही आहेत. त्यामुळे येथून खासगी विमान वाहतूक सुरू झाल्यानंतर पर्यटकही या सेवेचा लाभ घेतील, असे राऊत म्हणाले. हा विमानतळ खासगी विमानांसाठीही वापरला जाणार असल्याने रत्नागिरीच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे या विमानतळाचे विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे, असे आमदार उदय सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)
विमानतळ विकासात महत्त्वाचा टप्पा
By admin | Updated: August 24, 2016 22:23 IST