कडावल : कुसगाव परिसरात वन्य प्राण्यांकडून भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तोंडचा घास हिरावला जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. होणाऱ्या नुकसानीची पाणी करुन याबाबत वनविभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. कुसगाव-धांड्याचा पाचा व खडकबाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोर व वन्य प्राण्यांकडून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेषत: वनगाई व सांबरांकडून होणारा उपद्रव अधिक आहे. या वन्य प्राण्यांकडून भातपिकाची अतोनात हानी होत असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. वन्य प्राण्यांबरोबरच मोरांकडूनही पिकाला नुकसानीची झळ बसत आहे. सूर्योदय होऊन कोवळे ऊन पडले, की मोर कळपाने शेतीमध्ये उतरतात व भाताची केसरे तोडून पीक उद्ध्वस्त करतात. येथील मनोहर आचरेकर, गजानन आचरेकर, संभाजी आईर, प्रमोद आचरेकर, गोपाळ वायंगणकर व इतर काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कुसगाव हा सह्याद्री पर्वत रांगांच्या पायथ्याशी असलेला अतिशय दुर्गम भाग आहे. डोंगराळ व जंगलयुक्त परिसर असल्याने येथील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांचा उपद्रव नेहमीच सहन करावा लागतो. गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून भातपीक हे ग्रामस्थांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वन्य प्राण्यांकडून सातत्याने नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्य प्राण्यांमुळे येथील शेती व्यवसायच धोक्यात आला आहे. वनविभागाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)पावसाचे सावट : वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी अडचणीत-दुसरीकडे वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची टांगती तलवार त्यांच्या डोईवर कायम आहे. येथील शेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. रानटी हत्तींसह डुकरे, माकडे यासारखे वन्य प्राणी भातपीक उद्ध्वस्त करत आहेत. काही ठिकाणी मोरांकडूनही नुकसान होत असल्याची चर्चा आहे. एकंदरीत निसर्गाचा असहकार आणि वन्य प्राण्यांचा उपद्रव अशा दुहेरी अडचणीत बळीराजा अडकला आहे
वन्य प्राण्यांकडून भातपिकाचे नुकसान; शेतकरी हवालदिल
By admin | Updated: October 16, 2014 22:52 IST