कणकवली: महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहिन्याला २१०० रुपये मानधन देणार असल्याचे जाहीर केले होते. ते लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महिला रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करतील असा इशारा उद्धवसेनेच्या महिला आघाडीच्यावतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला. याबाबत कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संघटक निलम सावंत-पालव, तालुका संघटक वैदेही गुडेकर, माधवी दळवी, उपतालुकासंघटक संजना कोलते, शहर संघटक दिव्या साळगावकर, उपशहर संघटक रोहिणी पिळणकर, विभाग संघटक धनश्री मेस्त्री उपस्थित होत्या.निवेदनात म्हटले आहे की, ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे. अशा महिलांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना महायुती सरकारने सुरू केली. त्यांतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये दिले जातात. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी हे मानधन १५०० रुपयांवरून २१०० रुपये करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री व महायुतीतील नेत्यांनी दिले होते. तसेच निवडणूक जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख केला होता. त्या आश्वासनानुसार महिलांनी महायुतीला मोठे बहुमत दिले. मात्र, निवडणुकीत २१०० रुपयांचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात निवडणुकीनंतर अजूनही १५०० रुपये मानधनच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे महिलांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांना दरमहिन्याला २१०० रुपये मानधन लवकरात लवकर सुरू करावे. अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महिला रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन करतील असेही या निवेदनात म्हटले आहे.
ladki bahin yojana: महिलांना २१०० रुपये द्या, अन्यथा..; उद्धवसेना महिला आघाडीने दिला इशारा
By सुधीर राणे | Updated: March 20, 2025 19:10 IST