वेंगुर्ले : शिवसेना नेत्यांचा विश्वास असलेले परंतु मनात साशंकता धरून दोन दगडावर पाय ठेवून काही जण तळ्यातमळ्यात करीत आहेत, अशा आयात केलेल्या उमेदवारास शिवसेनेने उमेदवारी देवू नये. प्रसंगी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गेली तीन वर्षे संपर्क ठेवून निष्ठेने काम करत तळागाळातील शिवसैनिकांच्या समस्या व विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक काम करणाऱ्या शैलेश परब यांना उमेदवारी द्यावी. दिलेल्या उमेदवारास खासदार विनायक राऊत यांच्यासारखेच मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असा निर्णय वेंगुर्ले तालुका शिवसेनेच्या मासिक सभेत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला.वेंगुर्ले तालुका व शहर शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मासिक सभा येथील मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात तालुकाप्रमुख सुरेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, शहर सेनाप्रमुख विवेक आरोळकर, उपशहरप्रमुख वालावलकर, रमेश नार्वेकर, शहर महिला आघाडी अध्यक्षा निशा नाईक, सुरेश भोसले, विवेक कुबल, आनंद बटा आदी उपस्थित होते.विधानसभेची उमेदवारी निष्ठेने काम करणाऱ्याला द्यावी. कारण नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यानंतर शिवसेनेच्या या भागातील कठीण परिस्थितीत शिवसेना वाढविण्यासाठी प्रामाणिक काम करून ती पूर्ववत उभी केली. खासदार राऊत मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. त्यांना सावंतवाडी मतदारसंघात जास्त मताधिक्य आहे. त्यामुळे कुणीही उमेदवार दिला तरी तो निश्चितच मोठ्या मताधिक्याने निवडून येईल. त्यामुळे अनेक जण शिवसेनेच्या उमेदवारीसाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. संघटना बांधणीसाठी गेली ९ वर्षे परीश्रम घेणाऱ्या निष्ठावंताला उमेदवारी द्यावी किंवा निष्ठावंत शैलेश परब यांना उमेदवारी द्यावी, असाही निर्णय यावेळी घेण्यात आलेल्या सभेत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतला. (प्रतिनिधी)
विधानसभेची उमेदवारी निष्ठावंतालाच द्यावी
By admin | Updated: July 14, 2014 00:03 IST