मालवण : मालवण मेढा भागातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा तब्बल आठ दिवसांनी शोध लागला असून पोलिसांनी गुरुवारी त्या अल्पवयीन मुलीला मुंबई-माटुंगा येथून ताब्यात घेतले आहे. त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या संशयिताने त्या मुलीला मुंबई येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी सोडले होते. या प्रकरणाचा गाजावाजा झाल्यानंतर अपहरणकर्त्यांच्या नातेवाईकांनी त्या मुलीला माटुंंगा पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर मालवण पोलिसांनी ही कारवाई केली.याबाबतची माहिती अशी की, ५ मार्चच्या दरम्यान मालवण शहर परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रेवतळे आणि कुंभारमाठ परिसरातील अक्षय दशरथ भगत (वय २0) आणि सुमन विलास बांदकर (वय २१) या युवकांवर मालवण पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मुख्य सूत्रधार व अपहरण झालेल्या मुलीच्या शोधात पोलिसांचे पथक होते. पोलीस स्थानकात मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस या प्रकरणातील सूत्रधाराच्या शोधात असल्याचे समजताच अपहरणकर्त्याच्या नातेवाईकांनी त्या मुलीला माटुंगा पोलिसांच्या गुरुवारी ताब्यात दिले. यानंतर मालवण पोलिसांच्या पथकाने माटुंगा येथे जात त्या मुलीला ताब्यात घेऊन मालवण येथे आणले. सहाय्यक पोलीस निरीक्षक के राम हे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
‘ती’ युवती अखेर पोलिसांना सापडली
By admin | Updated: March 20, 2015 23:17 IST