शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

गणा धाव रेऽऽऽ...--कोकणातील गणेशोत्सव अनुभवावाच!

By admin | Updated: September 11, 2016 00:24 IST

कोकणातील जाखडीला ग्लोबल टच

शिव-पार्वती यांच्या नावाने रसिकांच्या मनात मानाचे स्थान मिळवणारी, परमेश्वराची आळवणी करणारी आणि आळवणी करता-करताच मनोरंजन करणारी, तोंडी प्रसारातून ग्रामीण लोककला जिवंत ठेवणारी जाखडी आता हळूहळू काळाच्या ओघात नष्ट होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील रोजगारांचा अभाव आणि शैक्षणिक असुविधा यामुळे वाढत्या शहरीकरणाचा फटका वर्षानुवर्षे चालत आलेल्या या लोककलेला बसला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश तरूणवर्ग मुंबई-पुणे किंवा अन्य शहरांकडे वळत असल्याने गणपती उत्सवात घरोघर फिरणाऱ्या जाखडीचे प्रमाण खूपच घटले आहे.लहानपणी गणेशोत्सवासाठी आजोळी जाताना जी काही आकर्षणं असायची, त्यात जाखडीचाही समावेश होता. मुळात पावसाळ्यात कोकणातली खेडी प्रचंड लोभस दिसतात. अतिशय शुद्ध अशा त्या हवेतच जगण्याची उमेद देण्याची खूप ताकद असते. तिथे मनोरंजनासाठी टीव्ही, मोबाईलसारख्या गोष्टींची आवश्यकता भासत नाही. कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले जुने मित्र-मैत्रिणी, नात्यांचा गोतावळा एकत्र भेटायचा हमखास सण म्हणजे गणेशोत्सव. या एकत्र भेटण्याच्या आनंदाइतकाच आनंद मिळायचा तो दुपारच्या वेळेत येणाऱ्या जाखडीमुळे. लहान मुलेच नाही तर मोठ्या माणसांनाही जाखडीची प्रतीक्षा असायची.समाजा-समाजांची एकत्र वस्तीची (वाडी) प्रथा अजूनही ग्रामीण भागात दिसते. मेणेवाडी, शिंदेवाडी अशा एकामागोमाग एक जाखड्या यायच्या. गणपतीचे पाच किंवा सहा दिवस या जाखड्या दुपारच्या वेळेत नियमित येत असत. घरमालक जी काही बिदागी देईल, ती घेऊन खुशीने पुढचे घर गाठत असत. अनेकदा ही जाखडी घरासमोरच्या पडवीतच उभी राहायची. पडवीच्या मधल्या खांबाला टेकून नाल वाजवणारे दोघेजण, मुख्य गायक आणि त्याला साथ देणारे दोघे-तिघे बसत असत. परमेश्वराची आराधना करून जाखडीला सुरूवात होत असे. सुमारे अर्धा-पाऊणतास किंवा यजमान खुशीत असला आणि पैसे सोडणारा असला तर तासभरापेक्षाही जास्तवेळ जाखडी रंगत असे. जाखडीनंतर पानसुपारी आणि एकमेकांची विचारपूस करून या आनंदाची सांगता होत असे. जाखडीचा तो ठेका पुढच्या वर्षीपर्यंत मनात रूंजी घालायचा. माझं आजोळ हे प्रातिनिधिक झालं. कोकणातल्या खेड्यांमध्ये प्राचीन काळापासून हेच वातावरण होतं. ती जगण्याची एक समाजमान्य पद्धतच होती. गणेशोत्सवापर्यंत शेतीची कामे आटोपलेली असतात. कापणीला वेळ असतो. अशा काळात कष्टकरी समाजाला उत्पन्नाचं एक साधनच या लोककलेने दिलं होतं. खोताच्या शेतातली कामे आटोपल्यानंतरच्या काळात तरूणांना बिझी ठेवणारा, त्यातून उत्पन्न आणि आनंदही मिळवून देणारा हा लोककला प्रकार. त्याची तयारी दोन-दोन, तीन-तीन महिने आधी सुरू होते. कोणत्या ओळीनंतर स्टेप बदलायची हे ठरवलं जातं. जाखडीच्या प्रमुख नर्तकाच्या तोंडात असलेली शिट्टी वाजली की स्टेप बदलायची. कधी कधी मुख्य नर्तक हात उंचावून स्टेप बदलण्याचा संकेत द्यायचा. हे सारं मन लावून बघण्यासारखं होतं. कुठल्याही नृत्यशाळेत नाचाचे किंवा संगीताचे शिक्षण न घेतलेली ग्रामीण भागातील ही तरूण मुलं ठेका अचूक पाळायची ती केवळ सरावातून आणि जाखडीच्या आवडीतून.काही वर्षांपूर्वी त्यात थोडं आधुनिकीकरण आलं. पारंपरिक चाली बाजूला ठेवून प्रसिद्ध झालेल्या हिंदी गाण्यांच्या चालीवर जाखडी नाचायला लागली. यंदा तर अनेक गाण्यांनी ‘सैराट’ चाल घेऊन जाखडी नाचवली. जाखडीची वेशभुषा (ड्रेपरी) हाही एक बघण्यासारखा विषय. राजा-महाराजांसारखी झूल खांद्यावर घेतलेले, काहीवेळा राजेशाही थाटाचा मुकुट डोक्यावर घातलेले हे तरूण हा थाट लक्ष वेधून घेणाराच. त्यांच्या पायातील चाळ जाखडीनृत्याच्या आनंदात भर घालणारेच. आता हे सारं अभावानंच दिसायला लागलंय. कुठे-कुठे जाखडीची पथके अजूनही तग धरून आहेत. पण एकतर ती अगदी व्यावसायिक पद्धतीने आधुनिक जाखडी सादर करतात किंवा त्यात फक्त लहान शाळकरी मुलेच असतात.जाखडीचे हे प्रमाण कमी होण्यामागचे सर्वात मुख्य कारण म्हणजे ग्रामीण भागातील रोजगारच्या अनुपलब्धी. ग्रामीण भागातील तरूणांच्या हाताला काम राहिलंय कुठे? शेती हा ग्रामीण भागांचा मुख्य व्यवसाय. शेतीचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मुख्य व्यवसायच अंतिम घटका मोजत असल्याने ग्रामीण भागातील तरूणांना पोटाची भूक भागवण्यासाठी शहराची वाट धरणं क्रमप्राप्तचं होऊ लागलं आहे. शहरात नोकरी करताना मग जाखडीचा सराव करता येत नाही. गणेशोत्सवाचे मोजकेच दिवस सुटी मिळते. त्यामुळे त्यांचा जाखडीतला उत्साह पूर्ण आटू लागला आहे. त्यात शहरात काम करतो म्हटल्यानंतर जाखडीत सहभागी होणं थोडं अप्रतिष्ठेचं वाटू लागलं आहे. त्यामुळे या लोककलेला आता उतरती कळा लागली आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाची दुरवस्था, हेही स्थलांतरामागचे मोठे कारण आहे. असंख्य खेड्यांमध्ये अजूनही चौथी-पाचवीपर्यंतच्याच शाळा आहेत. थोड्या मोठ्या खेड्यांमध्ये दहावीपर्यंतच्या शाळा आहेत. मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. त्यामुळेही अनेक लोक ग्रामीण भाग सोडून शहरांकडे वळू लागले आहेत. त्यामुळेही आता ग्रामीण भागातील जाखडीचा सूरही मंदावला आहे.- मनोज मुळ्ये, रत्नागिरी