आंबोली : आंबोली-मुळवंदवाडी येथील शहीद जवान पांडुरंग महादेव गावडे यांचे पार्थिव आज, मंगळवारी सकाळी गोव्यातून आंबोली येथे येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे. पार्थिव घरी ठेवण्यापूर्वी आंबोलीपासून गावडे यांच्या घरापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार असून, त्यानंतर काहीकाळ पार्थिव घरात ठेवून त्यांच्याच जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी मंत्री, आमदार, तसेच लष्करातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.श्रीनगर-कुपवाडातील चकड्रगमुल्ला या गावी शनिवारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत आंबोली-मुळवंदवाडी येथील पांडुरंग महादेव गावडे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रात्री त्यांचे श्रीनगर येथील रुग्णालयात निधन झाले. याबाबतची माहिती रविवारी सकाळी गावडे कुटुंबाला समजली होती. शहीद पांडुरंग गावडे यांचे पार्थिव सोमवारपर्यंत येईल, असे यावेळी कुटुंबाला सांगण्यात आले होते.मात्र, सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केली. यात पार्थिव सोमवारी सकाळी श्रीनगर येथून दिल्लीकडे रवाना झाले. दिल्ली येथे सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पार्थिव पोहोचले असून, तेथे लष्कराच्यावतीने शहीद पांडुरंग गावडे यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले होते. गोव्यात ते रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोहोचणार असून, आज सकाळी गोव्यातून आंबोलीत येईल. साधारणत: १० वाजण्याच्या सुमारास गावडे यांचे पार्थिव आंबोलीत पोहोचेल, अशी माहिती कुटुंबाने दिली आहे. शंभर जवान सोमवारी आंबोलीत दाखल शहीद जवान पांडुरंग गावडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, त्याची पूर्वतयारी करण्यासाठी बेळगाव येथील १४ मराठा लाईफ इन्फन्ट्रीचे शंभर जवान सोमवारीच आंबोलीत दाखल झाले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये करण्यात आली आहे. हे जवान आजच्या अंत्ययात्रेच्या कार्यक्रमाचा आढावा घेऊन तशी तयारी करणार आहेत.शिवलिंग तरुण मंडळाची मेहनत वाखाणण्याजोगीपांडुरंग गावडे यांच्या अंत्ययात्रेत ग्रामस्थ व विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होण्यासाठी येणार असल्याने त्यांची व्यवस्था कशी राखायची, याची व्यूहरचना शिवलिंग तरुण मंडळ करीत आहे. पार्किंगची व्यवस्था, तसेच शहीद जवान पांडुरंग गावडे यांचे फलकही ठिकठिकाणी लावण्याचे काम या मंडळाने रविवारपासून सुरू केले आहे. (प्रतिनिधी) पर्रीकरांसह तीन मंत्री येणारशहीद जवान पांडुरंग गावडे यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर हजर राहण्याची शक्यता आहे. मात्र, उशिरापर्यंत त्यांचा दौरा कार्यक्रम प्रशासनाकडे आला नव्हता. तर राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे सोमवारीच आंबोलीत येणार होते. त्यासाठी हेलिपॅडचीही व्यवस्था केली होती; पण पार्थिव सोमवारी येणार नसल्याची माहिती मिळाल्याने ते आज येणार आहेत. तसेच पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे, वैभव नाईक, जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
शहीद गावडे यांच्यावर आज अंत्यसंस्कार
By admin | Updated: May 24, 2016 01:32 IST