कुडाळ : येथील जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी औद्योगिक पशू-पक्षी व मत्स्य व्यवस्थापन प्रदर्शन व मेळाव्याचा समारोप शुक्रवारी झाला. सुमारे ७० ते ८० हजार लोकांनी या प्रदर्शन व मेळाव्याला उपस्थिती लावली. तर साडेतीन दिवस चाललेल्या प्रदर्शन व मेळाव्यामधील सहभागी स्टॉलवर सुमारे ४ कोटी ४० लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती समारोप कार्यक्रमात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली. कुडाळ येथील या राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन व मेळाव्याला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. या प्रदर्शनाचा समारोप शुक्रवारी सायंकाळी झाला. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, कुडाळ पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा घावनळकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, इतर जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तसेच कुडाळचे बीडीओ वासुदेव नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी रणजीत देसाई म्हणाले, या प्रदर्शनामध्ये राज्यातील कृषी व पशुपक्षी विभागातील नवनवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्या स्टॉलनी सादरीकरण केले होते. याचा येथील शेतकऱ्यांना शेतीसह पशुसंवर्धन व्यवसाय वाढीसाठी निश्चित उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. (प्रतिनिधी)
कृषी प्रदर्शनात साडेचार कोटींची उलाढाल
By admin | Updated: March 20, 2015 23:16 IST