कुडाळ : सावंतवाडी येथे १ ते ४ मे या कालावधित होणाऱ्या ‘फ्रुट अँड फ्लॉवर फेस्टिव्हल आॅफ मोती तलाव- २०१५’ मध्ये सरंबळ गावच्या महिलांनी पुढाकार घेऊन सरंबळ शाश्वत विकास मंच तयार केला असून, त्यांनी दुर्लक्षित फळे व फुलांपासून पदार्थ बनविले आहेत. त्यांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. या महिलांनी सिंधुदुर्गात उपलब्ध असलेल्या व दुर्लक्षित फळ आणि फु लांपासून विविध नावीन्यपूर्ण पदार्थ बनविले आहेत. प्रशिक्षण आणि मार्गदर्शन ओंकार केणी आणि स्यमंतक जीवन शिक्षण विद्यापीठाचे कार्यकर्ते कृष्णा चव्हाण यांनी दिले आहे. सावंतवाडीमध्ये होणाऱ्या उत्सवामध्ये या महिलांनी सिंधुदुर्गातील दुर्लक्षित फळ आणि फुलांपासून बनविलेले पदार्थ, जास्वंद फुलापासून सरबत, करवंदाचे लोणचे, मुरांबा जॅम, उकडीच्या तांदळाचे लाडू, बेलफळापासून जॅम, कॅन्डी सरबत तसेच फणसाच्या बियांचा स्वादिष्ट कटलेटचा स्वाद घ्यायला मिळणार आहे. सरंबळ या गावातील महिलांना गुचिरा प्रॉडक्शनकडून विशेष प्रोत्साहन देण्यात आले आहे. या महिलांनी बनविलेले पदार्थ पाहण्याकरिता या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
दुर्लक्षित फळा-फुलांपासून बनविले खाद्यपदार्थ
By admin | Updated: April 18, 2015 00:13 IST