मालवण : वर्गमित्रासहित त्याची बहीण व भाऊ यांना सुमारे पाच लाख ५२ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कणकवली- तोंडवळी येथील श्रीकृष्ण श्यामसुंदर कुडतरकर (वय ४०) याला आज, शुक्रवारी मालवण न्यायालयाने दोषी ठरविले. त्याला दोन वर्षे सश्रम कारावास, तसेच वर्गमित्र व संबंधितांना तीन महिन्यांच्या आत सर्व रक्कम परत करण्याचे आदेश दिले. मुदतीत कुडतरकर याने रक्कम परत न दिल्यास सहा महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.कणकवली-तोंडवळी येथील श्रीकृष्ण कुडतरकर याने १६ नोव्हेंबर २०११ ते एप्रिल २०१२ या कालावधीत वर्गमित्र असणाऱ्या मालवण येथील आनंद संभाजी वळंजू यांना आलिशान फ्लॅट देतो, असे सांगून लाखो रुपयांना गंडा घातला होता. कुडतरकर याने वळंजू यांच्याकडून चार लाख ५० हजार रुपये, त्यांची ओरोस येथे राहणारी बहीण सविता सुनील कदम हिच्याकडून ३४ हजार रुपये, तसेच वळंजू यांचे भाऊ विलास वळंजू यांच्याकडून ६४ हजार रुपये वेगवेगळ्या कारणांसाठी घेतले होते. काही कालावधीनंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आनंद वळंजू यांनी कुडतरकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मालवण न्यायालयात याबाबत सुनावणी होऊन कुडतरकर याला दोषी ठरवून दोन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. कुडतरकर याने आनंद वळंजू, भाऊ विलास व बहीण सविता कदम यांना तीन महिन्यांच्या आत त्यांची घेतलेली रक्कम नुकसानभरपाईपोटी द्यावी. ही रक्कम न दिल्यास पुन्हा सहा महिन्यांची साधी कैद ठोठावण्यात आली. दिवाणी न्यायाधीश भेंडवडे यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील म्हणून अॅड. सतीश धामापूरकर यांनी काम पाहिले. या प्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक बाबूराव राठोड यांनी तपास केला. (प्रतिनिधी)
साडेपाच लाखांचा गंडा; युवकास सक्तमजुरी
By admin | Updated: September 20, 2014 00:33 IST