कणकवली : ताप येत असल्याने रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या पाच मुलांचा रक्तनमुना अहवाल स्वाइन पॉझिटिव्ह आला आहे. पुणे येथील एनआयव्ही संस्थेकडे हे रक्तनमुने पाठविले होते. पाचही जणांची स्थिती सुधारत असून, दोन लहान मुलांना घरी सोडण्यात आले आहे.अजिंक्य प्रेमनाथ रासम (वय १०, रा. कलमठ, मूळ हरकुळ खुर्द), वेदिका शैलेश फोंडेकर (५ वर्षे, रा. साईनगर, फोंडा), गुलाम सिद्धी शब्बीर रमदुल (६, रा. उंबर्डे, ता. वैभववाडी), श्रेया शरद पाटील (साडेतीन वर्षे), अद्वैत शरद पाटील (दीड वर्षे, दोघेही रा. रामगड, बेळणे, ता. मालवण) अशी या मुलांची नावे आहेत. यापैकी अजिंक्य रासम व वेदिका फोंडेकर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. गुलाम रमदुल खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. तेथून त्याला कोल्हापूर येथे दाखल केले. या मुलांना ताप येत असल्याने ४ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल केले होते. श्रेया व अद्वैत यांना ३१ आॅगस्ट रोजी गोवा-बांबुळी येथे अधिक उपचारासाठी दाखल केले होते. नागरिकांनी स्वाइन फ्लू साथीला न घाबरता योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सिंधुदुर्गातील पाच मुलांना ‘स्वाइन’
By admin | Updated: September 8, 2015 22:56 IST