मालवण : शहरातील आडारी येथील पालिकेच्या कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये बुधवारी सायंकाळी उशिरा लागलेली भीषण आग साडेचार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर रात्री साडे अकरा वाजता आटोक्यात आली.मालवण पालिकेचा अग्निशमन बंब नसल्याने कुडाळ व वेंगुर्ला पालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली.शहरात आडारी येथे पालिकेचे कचरा डम्पिंग ग्राऊंड असून शहरातील विविध प्रकारचा कचरा याठिकाणी आणून टाकला जातो. काही दिवसांपूर्वी कचऱ्याचे बायोमायनिंगचे काम पालिकेने सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी उशिरा या कचरा डम्पिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला अचानक आग लागली.वाऱ्याने भडकलेल्या या आगीने भीषण रूप धारण केले होते. मात्र, पालिकेचा अग्निशमन बंब नसल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात न आल्याने वेंगुर्ला, कुडाळ येथील अग्निशमन बंब बोलाविण्यात आले. हे बंब रात्री दाखल होताच पाण्याच्या माऱ्याने ही आग रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आली.आग आटोक्यात आणण्याचे काम मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे स्वच्छता निरीक्षक विजय खरात, मुकादम आनंद वळंजू, पालिकेचे कर्मचारी तसेच चालक गौरव सोनवडेकर, भरत जाधव, कृष्णा कांबळे, सुधीर आचरेकर, मिथुन शिगले, सुधाकर कासले, हेमंत वायंगणकर, संतोष कोळंबकर, सदाशिव मालवणकर यांनी केले. तसेच कुडाळ व वेंगुर्ला अग्निशमन बंबाचे कर्मचारी यांच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.
आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 17:56 IST
malvan, muncipaltyCarportaion, sindhudurnews, Garbege मालवण शहरातील आडारी येथील पालिकेच्या कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये बुधवारी सायंकाळी उशिरा लागलेली भीषण आग साडेचार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर रात्री साडे अकरा वाजता आटोक्यात आली.
आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये आग
ठळक मुद्देआडारी येथील कचरा डम्पिंग ग्राऊंडमध्ये आग चार तासांच्या प्रयत्नांनंतर आटोक्यात