मडुरा : इन्सुली येथील वादग्रस्त सूत गिरण जमिनीच्या परिसरात बेकायदेशीररित्या लावण्यात आलेले जाहिरात फलक तातडीने हटवावेत, यासाठी आज सूत गिरण संघर्ष समितीच्यावतीने सरपंच अश्विनी परब यांना घेराओ घालण्यात आला. यावेळी भूमिपुत्र आक्रमक झाल्याने सरपंच परब यांनी स्वत: ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांदा पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यानंतर, येत्या आठ दिवसांत जाहिरात फलक न हटविल्यास आंदोलन करण्यात येईल, इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष विकास केरकर यांनी यावेळी दिला.सरपंच परब यांनी जाहिरात फलक हटविण्याबाबत संबंधितांना दोन दिवसांपूर्वी नोटीस बजाविण्यात आली असून आठ दिवसांची मुदत देण्यात आल्याचे यावेळी सांगितले. मात्र, ग्रामस्थांनी तातडीने हे फलक हटविण्याची मागणी केल्याने वातावरण काही काळ तणावग्रस्त बनले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सूत गिरण परिसरातील जाहिरात फलक तातडीने काढा, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. मात्र, सरपंच परब यांनी स्वत:च कार्यालयाला टाळे ठोकल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांनी सरकारी कार्यालयाला टाळे ठोकणे हे बेकायदेशीर असल्याचे सांगत कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर कार्यालयाचे टाळे खोलण्यात आले. परब यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहिरात फलक हटविण्याबाबत नोटीस दिल्याचे सांगितले. येत्या आठ दिवसांत फलक न हटविल्यास प्रसंगी आंदोलन उभारण्याचा इशारा विकास केरकर यांनी यावेळी दिला. यावेळी इन्सुली उपसरपंच बंड्या पालव, तेजस पालव, नलू मोरजकर, ग्रामपंचायत सदस्य प्रताप सावंत, संदीप कोठावळे, नंदकिशोर कोठावळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)परब यांना जाब विचारलाइन्सुली येथील सूत गिरण परिसरातील जमीन वादग्रस्त असून, याबाबत सूत गिरण प्रशासन व स्थानिक भूमिपुत्र यांच्यात गेली कित्येक वर्षे संघर्ष सुरूआहे. यासाठी संघर्ष समितीच्यावतीने वेळोवेळी आंदोलने उभारण्यात आली. इन्सुली जिल्हा परिषद रस्त्याच्यानजीक तसेच माडभाकरवाडी परिसरात कंपनीच्यावतीने विनापरवाना जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. या फलकांना संघर्ष समितीने हरकत घेतली. याबाबत जाब विचारण्यासाठी मंगळवारी विकास केरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक भूमिपुत्र ग्रामपंचायत कार्यालयानजीक जमा झाले. याबाबत सरपंच अश्विनी परब यांना जाब विचारण्यात आला.
इन्सुली ग्रामस्थांचा सरपंचांना घेराओ
By admin | Updated: September 16, 2014 23:26 IST