वेंगुर्ले : वेंगुर्ले शहराला २४ तास पाणी पुरवठा होण्यासाठी व निशाण तलावाची उंची वाढविण्याच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाने नगर परिषदेला ५ कोटी ८२ लाख ९५ हजार रुपये मंजूर केल्याची माहिती नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच शासनाने नगरोत्सवमधून २ कोटी ७५ लाख रुपयांची १३ कामे मंजूर केली आहेत. तसेच मच्छिमार्केटच्या बांधकामासाठी २ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले असल्याचेही यावेळी कुबल यांनी सांगितले. शहरात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी पणनमंत्री, पाणी पुरवठा मंत्री, पाणी पुरवठा अभियंता यांच्याशी सातत्याने आपण संपर्क ठेवून पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली होती. वेंगुर्ले शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निशान तलावाची उंची अडीच मिटरने वाढविण्यासाठी शासनाने निशाण तलावाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी ५ कोटी ८२ लाख ९५ हजार रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे शहरवासीयांना २४ तास मुबलक पाणी मिळू शकेल, असे कुबल यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार वेंगुर्ले मच्छिमार्केटच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या मत्स्योद्योग विभागाकडून मत्स्योद्योग पायाभूूत योजनेंतर्गत अडीच कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती कुबल यांनी दिली. नगरपरिषदेच्या बाजारपेठेतील गाळेधारकांचा प्रश्न आता सुटला असून आता समिती स्थापन करून भाडे ठरविणार असल्याचे कुबल यांनी सांगितले. शहराच्या विकासासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना आपण तसेच उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, नगरसेवक रमण वायंगणकर, सुलोचना तांडेल, अन्नपूर्णा नार्वेकर, चेतना केळूसकर, पद्मिनी सावंत, सुषमा प्रभूखानोलकर, नीला भागवत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक नाईक, शहराध्यक्ष सचिन वालावलकर, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बबन नार्वेकर यांनी भेट देऊन शहरीकरणासाठी निधीची मागणी केली असल्याचे कुबल यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर, नगरसेवक रमण वायंगणकर, सुलोचना तांडेल, अन्नपूर्णा नार्वेकर, चेतना केळूसकर, सुषमा प्रभूखानोलकर, नीला भागवत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अकरा कोटींचा निधी मंजूर
By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST