कणकवली : पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चौपदरीकरण कामांची चांगलीच पोलखोल केली आहे. महामार्गालगत ठिकठिकाणी मातीचा भराव वाहून गेला आहे. तरअनेक ठिकाणी पर्यायी रस्ता खचला आहे. महामार्गालगतच्या घरांमध्येही पाणी गेले आहे. आज कणकवली शहर आणि वागदे परिसरात असलेल्या या रस्त्यामध्ये अनेक वाहने अडकली होती. बस स्थानक परिसरात रस्ता खचल्याने एसटी महामंडळाची बस देखील अडकून पडली होती.
7 जूनला केरळ येथे मान्सून दाखल होणार असल्याचे वृत्त वेधशाळेने वर्तवले होते. त्यामुळे येणाऱ्या पाच ते सहा दिवसांत हा पाऊस कोकणात येण्याची शक्यता होती. परंतु गुरुवारी सकाळीच मान्सूनपूर्व पावसाने मोठ्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह आपली हजेरी दर्शविली. तासभर पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात संपुष्टात येण्याची शक्यता आहे.
आकेरीत मुंबई-गोवा मार्गावर कोसळले झाडसावंतवाडीसह अन्य भागात पावसाने गुरुवारी विजेच्या कडकडाटासह पहाटेच हजेरी लावली. वारा आणि पाऊस जोरदार सुरू झाल्याने मुंबई-गोवा मार्गावर आकेरी हेळ्याचे गाळू परिसरात मोठे झाड कोसळले. हे झाड जुने असल्याने ते कोसळल्याचे निदर्शनास येते आहे. झाड कोसळल्याने सावंतवाडीहून कुडाळकडे जाणारी वाहतूक व कुडाळहून सावंतवाडीकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. काही वाहने आता आकेरी तिठ्यावरुन झाराप-पत्रादेवी महामार्गाच्या दिशेने मार्गस्थ होत कुडाळच्या दिशेने जात होती.