रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठीची वेळ निघून गेली आहे. आता शिवसेना माघार घेणार नाही. निवडणूक होणारच आणि जेथे जेथे शिवसेनेने उमेदवार उभे केले आहेत, तेथे निवडणूक होणारच, अशी ठाम घोषणा शिवसेनेच्या शिवसंकल्प पॅनेलचे प्रमुख माजी आमदार सुभाष बने यांनी केली. या निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळावे, यासाठी शिवसेना पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची एक बैठक आज, मंगळवारी चिपळूणमध्ये होणार आहे. खासदार विनायक राऊत या बैठकीला उपस्थित राहून व्यूहरचना ठरविणार आहेत, असेही बने यांनी सांगितले. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सहकार पॅनेलकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना बने यांनी ही माहिती दिली. आता शिवसेनेचा कोणताही उमेदवार माघार घेणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. आता हेच वर्चस्व सहकारात मिळविण्यासाठी शिवसेना सर्व जागांवर लढत आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवसेना बळकट आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. त्याचा उपयोग सहकार क्षेत्रात घेण्याचा प्रयत्न आहे. शिवसंकल्पच्या उमेदवारांनी आपल्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.
आता माघार नाही! निवडणूक होणारच!
By admin | Updated: April 14, 2015 01:10 IST