सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी नेमलेल्या ५६ विषय व विशेष तज्ज्ञांनी शाळांना भेटी दिल्याच्या नोंदी केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात याची चौकशी केली असता या तज्ज्ञांनी शाळांना भेटी न दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत या सर्वच तज्ज्ञांची झाडाझडती घेत आता गय केली जाणार नाही. प्रत्येकाने कामाला लागा, असे आदेश दिले.शैक्षणिक गुणवत्तेसाठी नियुक्त केलेल्या या विषयतज्ज्ञ आणि विशेष तज्ज्ञांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली. यावेळी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी आर. पी. धाकोरकर आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील शासकीय शाळांमधील गुणवत्ता वाढावी, यासाठी जिल्ह्यात ४० विषयतज्ज्ञ व १६ विशेषतज्ज्ञ काम करतात. दर महिन्याला या तज्ज्ञांनी १० ते १२ शाळांना भेटी द्याव्यात व त्या भेटीत त्या शाळांमधील त्रुटीची नोंद करावी. पुन्हा दुसऱ्या भेटीत त्या त्रुटींची सुधारणा झाली आहे हे पाहावे. भाषा, गणित, विज्ञान या विषयानुसार गट करावेत व गुणवत्ता वाढविण्याचे काम करावे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची पडताळणी करावी, अद्ययावत येणाऱ्या अडचणींची नोंद करून त्यांची सोडवणूक करावी, ही या तज्ज्ञांची जबाबदारी आहे. असे असताना याबाबतची झाडाझडती घेताच कोणीही विषयतज्ज्ञ समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे या विषयतज्ज्ञ शिक्षकांचा बेशिस्त कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी कडक समज देत गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने काम करा, असे आदेश दिले आहेत.प्रत्येक तालुक्यासाठी ६ तज्ज्ञ असून या तज्ज्ञांनी तालुक्यातील सर्व शाळांना भेटी द्याव्यात. एका शिक्षकाने किमान १२ शाळांना भेटी देऊन ग्रामीण भागातील शाळांपर्यंत पोहोचावे व सर्वच तालुक्यात या तज्ज्ञांनी काम केल्यास निश्चितपणे सर्व शाळांची गुणवत्ता त्यामधील त्रुटी दूर होऊन कामकाज करता येईल व गुणवत्ताही वाढविता येईल. यादृष्टीने या तज्ज्ञांना नियोजन देण्यात आले असून, यापुढे ज्या शाळांना ज्या विषयतज्ज्ञांनी भेटी दिल्या त्याची पडताळणीही केली जाणार असल्याचे संकेत सभेत देण्यात आले. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नाराजी.कामचुकार विषयतज्ज्ञांची गय करणार नाही, शेखर सिंह यांच्यासह संदेश सावंतांचा इशारा.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांची गुणवत्ता वाढीसाठी ४० विषयतज्ज्ञांसह १६ विषयतज्ज्ञांचा समावेश.
विषयतज्ज्ञांची झाडाझडती
By admin | Updated: September 8, 2015 23:35 IST