चिपळूण : चिपळूण तालुका अपंग सेवा संस्थेतर्फे तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्यात आले. या उपोषणात १५० हून अधिक अपंग बांधव सहभागी झाले होते. येत्या महिनाभरात मागण्या मार्गी लागल्या नाहीत, तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा देऊन हे उपोषण दुपारी स्थगित करण्यात आले. चिपळुणातील अपंग बांधवांच्या विविध मागण्या प्रलंबित असल्याने त्यांच्यामध्ये असंतोष आहे. प्रशासन या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याने या अपंग बांधवांनी उपोषण सुरु केले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी अपंगांची भेट घेऊन येत्या ८ दिवसात पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याशी आपली चर्चा घडवून आणतो, असे आश्वासन दिले. गटविकास अधिकारी गणेश पिंपळे, तहसीलदार वृषाली पाटील यांनी अपंगांची भेट घेऊन त्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली व शासन पातळीवर आपणास सर्वतोपरी सहकार्य करु, असे आश्वासन दिले. संस्थेचे अध्यक्ष बारकू फुटक, अश्विनी उंडरे, अलका वारे, संजीव उदेग, कृष्णा मोरे, अ. लतीफ कडवेकर, जमिना कडवेकर, दिलशाद अनवारे, सरिता माने, शंभवी जाधव, नेहा चव्हाण, दर्शना महाडिक, दीपाली जंगम आदींनी अर्ज दिले.या उपोषणस्थळी नगरसेवक राजेश कदम, मोहन मोरे, विलास हारे, यशवंत शिंदे आदींनी भेट दिली. संस्थेचे सचिव जयराम होळकर यांनी पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
चिपळुणात अपंग बांधवांचे उपोषण सुरु
By admin | Updated: January 28, 2015 00:52 IST