CoronaVirus Lockdown : चर्मवाद्य व्यवसाय धोक्यात,  आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:40 PM2020-06-11T12:40:10+5:302020-06-11T12:42:37+5:30

भविष्यात सार्वजनिक उत्सव व सणांवर कडक बंदी आल्यास चर्मवाद्ये बनविण्याचा व्यवसाय धोक्यात येणार आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर सध्यातरी टांगती तलवार राहणार आहे.

CoronaVirus Lockdown: Leather business threatened, financial blow | CoronaVirus Lockdown : चर्मवाद्य व्यवसाय धोक्यात,  आर्थिक फटका

कारागीर चर्मवाद्ये बनवितानाचे संग्रहीत छायाचित्र.

googlenewsNext
ठळक मुद्देचर्मवाद्य व्यवसाय धोक्यात,  आर्थिक फटकासण, उत्सवांवर कडक बंदी असल्याने व्यावसायिकांचा हिरमोड

प्रथमेश गुरव 

वेंगुर्ला : दिवसेंदिवस कोरोनाचे संकट उग्र रूप धारण करीत आहे. काही प्रमाणात दैनंदिन व्यवहार सुरू झाले असले तरी सार्वजनिक उत्सव व सणांबाबत अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही. गणेशोत्सव, सप्ताह, व्रतवैकल्ये साजरे करताना भजनासाठी लागणारी तबला, पखवाज, ढोलकी आदी चर्मवाद्ये बनविणाऱ्यांचे अर्थकारण यावर अवलंबून आहे. भविष्यात या सणांवर कडक बंदी आल्यास चर्मवाद्ये बनविण्याचा व्यवसाय धोक्यात येणार आहे. त्यामुळे या व्यावसायिकांवर सध्यातरी टांगती तलवार राहणार आहे.

कोकणात भजन हा कलाप्रकार सर्रास वर्षभर दिसून येतो. मात्र, गणेशोत्सवात याचे प्रमाण वाढलेले असते. अलीकडच्या काही वर्षांत तबला व पखवाज शिकविण्याचे क्लासेस ठिकठिकाणी सुरू झाल्याने लहान मुलांबरोबरच तरुणांचाही ओढा हे शिक्षण घेण्यासाठी वाढला आहे. तसेच नवनवीन भजन मंडळांची निर्मिती झाल्याने तबला, पखवाज, ढोलकी यांची असलेली मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

कारागीर वादकांच्या मागणीनुसार तबला, पखवाज व ढोलकी बनवून देत असतात. पण त्यासाठी लागणारे चामडे शोधणे, त्यावर प्रक्रिया करणे आदी खूपच जिकिरीचे असते. तसेच ते बनविणे हेही शारीरदृष्ट्या कष्टाचे आहे. परंतु त्याची तमा न बाळगता कारागीर कितीही कष्ट पडले तरी वादकांच्या पसंतीनुसार चर्मवाद्ये बनवून देत असतात.

गणेशोत्सवाबरोबरच अखंड भजनी सप्ताह, श्रावण महिन्यातील विविध पूजा आदींसाठी ठिकठिकाणी भजनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भजन कलाप्रकारात चर्मवाद्यांची आवश्यकता असते. त्यामुळे जूनपासून चर्मवाद्ये बनविण्याच्या कामाला कारागीर सुरुवात करतात. मात्र, यावर्षी कोरोनाची झळ या चर्मवाद्ये दुरुस्ती व्यवसायालाही बसणार आहे. वेंगुर्ला तालुक्यात भाद्रपद महिन्याबरोबरच आषाढ व श्रावण या महिन्यांतही धार्मिक उत्सव असल्याने मोठ्या प्रमाणात भजने सादर होत असतात.

टांगती तलवार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन व्यवहार सुरू झाले असले तरी येथील सण आणि सार्वजनिक उत्सवांबाबत अजून ठोस निर्णय झालेला नसल्याने चर्मवाद्ये दुरुस्ती व्यावसायिकांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एवढ्यात ठिकठिकाणी चर्मवाद्ये दुरुस्तीची कामे सुरू होणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही कामे सुरू झाली नाहीत. सण व उत्सव साजरे करण्यासाठी शासन परवानगी कधी देते याकडे चर्मवाद्ये दुरुस्ती व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे. परंतु, तोपर्यंत तरी या व्यावसायिकांवर टांगती तलवार राहणार आहे.


गेली ३५ वर्षे मी वेंगुर्ला येथे तबला, ढोलकी, पखवाज आदी चर्मवाद्ये बनवित आहे. पण कोरोनामुळे इतर व्यवसायांप्रमाणे चर्मवाद्य दुरुस्तीच्या व्यवसायावरही गदा आली आहे. शासनाचा या व्यवसायाबद्दल काहीच निर्णय न झाल्याने माझ्यासारचे अनेक व्यावसायिक आज अडचणीत आले आहेत. या व्यवसायावर केवळ आमचेच नव्हे तर काही कारागीरांचेही घर चालते. त्यामुळे यापुढे या रोजगार उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह आहे. सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून हा व्यवसाय सुरू करण्यास आम्हांला लवकरच परवानगी द्यावी.
- भाई खानोलकर,
तबला कारागीर, खानोली-वेंगुर्ला
 

Web Title: CoronaVirus Lockdown: Leather business threatened, financial blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.