दोडामार्ग : हत्तीपकड मोहिमेची दिशा ठरविण्याबाबत दोडामार्ग येथे शेतकरी आणि वनविभाग यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांमध्येच हत्तीपकड मोहीम राबवावी की उपाययोजना कराव्यात, यावरून मतमतांतरे असल्याचे समोर आले. या मुद्द्यावरून मुख्य वनसंरक्षकांसमोरच स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस व मोर्लेचे उपसरपंच संतोष मोर्ये यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावरून शेतकरीच आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी हस्तक्षेप करीत आपापसात न भांडता ज्या ग्रामपंचायतींना उपाययोजनांची गरज आहे त्यांनी तसा ठराव द्या, असे सांगून वातावरण शांत केले. तर वनाधिकाऱ्यांनीही त्याला सहमती दर्शविली तसेच मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी हत्तीपकड मोहिमेसंदर्भात कर्नाटकच्या मंत्र्यांशी बोलण्यासंदर्भात वनमंत्री, पालकमंत्री आणि शेतकरी यांच्याशी संयुक्त बैठक लावून निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे हत्तीपकड मोहिमेचा चेंडू आता वनमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे.हत्तीपकड मोहिमेचा आदेश देऊन दोन महिने पूर्ण झाले तरीही अद्याप हत्तीपकड मोहीम हाती घेतली नसल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी आठ दिवसांपूर्वी वनविभागाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी हत्तीबाधित क्षेत्रातील सरपंच, शेतकरी व वनाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीस मुख्य वनसंरक्षक रामानुजन, उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहायक वनसंरक्षक सुनील लाड, वैभव बोराटे प्रभारी वनक्षेत्रपाल सुहास पाटील, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजपा मंडळ अध्यक्ष दीपक गवस, उद्धवसेना तालुकाप्रमुख संजय गवस, मोर्ले उपसरपंच संतोष मोर्ये, युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे, हत्तीबाधित क्षेत्रातील गावांचे सरपंच आदी उपस्थित होते.
दिरंगाईबाबत शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्राहत्तीपकड मोहीम राबविण्यास झालेल्या दिरंगाईबाबत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकाऱ्यांनी हत्तीपकड मोहीम राबविणे कर्नाटकवर अवलंबून आहे. शिवाय पकडलेला हत्ती कुठे ठेवावा, याची तजवीज झाल्यावरच निर्णय होऊ शकतो. याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसा प्रस्तावही पाठविल्याचे सांगितले.
बाबूराव धुरींची यशस्वी मध्यस्तीयाचदरम्यान उपाययोजना राबवाव्यात की हत्तीला पकडावे, यावरून शेतकऱ्यांमध्येच एकमत न झाल्याने प्रवीण गवस, दत्ताराम देसाई व मदन राणे आणि राजन मोर्ये यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. उपाययोजना नको हत्तीपकड मोहीम राबवा, असे गवस यांचे म्हणणे होते. तर मोर्ये व राणे यांनी आमच्या गावात उपाययोजना हव्यात, असे अधिकाऱ्यांना सांगितले. यावरून शेतकऱ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. अखेर बाबूराव धुरी यांनी मध्यस्थी करत ज्यांना उपाययोजना हव्या असतील त्यांनी तसा ठराव द्या, असे सांगितले व त्याला अधिकाऱ्यांनीही संमती दिली.
हत्तीपकडसाठी कर्नाटकच्या वनमंत्र्यांशी बोलणी होणारहत्तीपकड मोहिमेबाबत निर्णय घेण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक, पालकमंत्री नितेश राणे व शेतकऱ्यांची लवकरच बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीत हत्तीपकड मोहीम राबविण्यासाठी कर्नाटकच्या वनमंत्र्यांशी बोलण्यासंदर्भात विनंती केली जाईल, असे शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजपचे तालुकाप्रमुख दीपक गवस व उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी सांगितले.