मालवण : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून मालवण दांडी समुद्र किनारी उभारलेल्या देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीचा शुभारंभ आमदार नीलेश राणे यांच्या हस्ते झाला. ही जेटी किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या फ्लोटिंग जेटी उभारणीबाबत आमदार नीलेश राणे, खासदार नारायण राणे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे तसेच राज्य शासनाचे स्थानिकांनी आभार मानले आहेत. ही जेटी पर्यटन वाढीसाठी महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी सांगितले.मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. मागील डिसेंबर महिन्यात एक लाखापेक्षा जास्त पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. मालवण बंदर जेटी येथून प्रवासी बोटीने पर्यटक किल्ल्यावर जातात. त्याच धर्तीवर दांडी येथील फ्लोटिंग जेटीचा वापर करून प्रवासी बोटीने पर्यटकांना किल्ल्यावर जाता येणार आहे, अशी माहिती बंदर अधिकारी यांच्यावतीने देण्यात आली.यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळ सिंधुदुर्ग प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगले, कार्यकारी अभियंता मनीष मेतकर, उपअभियंता दीपक पेटकर, शाखा अभियंता परेश शिंदे, प्रवीण शिंदे, मालवण बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांसह मच्छिमार बांधव, पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.बंधारा कम रस्ता व्हावादांडी चौकचा मंदिर ते मोरेश्वर किनारी बंधारा कम रस्ता व्हावा. या मागणीबाबत नारायण धुरी व स्थानिक नागरिकांनी आमदार नीलेश राणे यांच्याशी चर्चा केली. याबाबत निश्चितच प्रयत्नशील असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले.
देशातील पहिल्या फ्लोटिंग जेटीची दांडी समुद्र किनारी उभारणी, किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 13:40 IST