कनेडी : बाळ जन्मल्यापासूनच त्याची व्यवस्थित स्वच्छता राखली तर त्याचे भावी आयुष्य उज्ज्वल होईल. स्वच्छतेमुळे मन व बुद्धी तल्लख राहून यश दृष्टीक्षेत्रात येईल, असे प्रतिपादन वसंत नारायण पाटकर मेमोरियल ट्रस्ट डोंबिवलीचे अध्यक्ष डी. ए. पाटकर यांनी केले.वसंत नारायण पाटकर मेमोरियल ट्रस्ट डोंबिवलीच्यावतीने ल. गो. सामंत विद्यालय हरकुळ बुद्रुकच्या सभागृहात ‘स्वच्छ शाळा- सुंदर शाळा व व्यायामशाळा’ हा कार्यक्रम रविवारी घेण्यात आला. या कार्यक्रमात डी. ए. पाटकर बोलत होते. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त दीपक पाटकर, अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. शमिता बिरमोळे, चेअरमन डॉ. सुहास पावसकर, सरपंच आनंद ठाकूर, माजी सभापती बुलंद पटेल, दीपा पाटकर, मालिनी पाटकर, माजी शिक्षण विस्तार अधिकारी मोहन सावंत, माजी कार्याध्यक्ष प्रकाश कांडरकर, मनोज सावंत, प्रकाश घाडीगावकर, मुख्याध्यापक प्रताप सावंत, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.डॉ. बिरमोळे म्हणाल्या, स्वच्छतेला महत्त्व देताना मंदिरे बांधण्यापेक्षा स्वच्छतागृहे बांधा. समाजाला स्वच्छतेची खरी गरज आहे. पाटकर ट्रस्ट करीत असलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी व कौतुक करण्याजोगे आहे. त्यांच्यातील दातृत्वाला सलाम आहे. बुलंद पटेल म्हणाले, पैसा खूप लोकांकडे असतो; परंतु त्याचे दानत्व हे फार कमी लोकांकडे असते. पाटकर ट्रस्ट राबवत असलेले प्रत्येक उपक्रम हे नि:स्वार्थी भावनेने राबविले जातात. त्यांची प्रेरणा इतरांनीही घेतली पाहिजे. पाटकर कुटुंबाने समाजसेवेसाठी वाहून घेतले आहे, असे सांगितले.यावेळी निराधार, अपंग, गरजू, होतकरी व हुशार विद्यार्थ्यांना पाटकर ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली. ल. गो. सामंत विद्यालयाला एक सुसज्ज असे शौचालय बांधून देण्यात आले. याचे उद्घाटन डी. ए. पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे जंगमवाडी येथे सुसज्ज व्यायामशाळा ट्रस्टने बांधली आहे. त्याचे उद्घाटन मालिनी पाटकर व डी. ए. पाटकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ल. गो. सामंत विद्यालयाच्यावतीने डी. ए. पाटकर, मोहन सावंत यांचा सत्कार करण्यात आला. गेले काही वर्षे पाटकर ट्रस्ट हरकुळ बुद्रुक, तसेच पंचक्रोशीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. त्यांचे हे कार्य खरोखरच प्रेरणादायी असल्याचे मोहन सावंत यांनी सांगितले. मोहन सावंत यांनी प्रास्ताविक केले. तर राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)
स्वच्छतेमुळे मन, बुद्धी तल्लख राहते
By admin | Updated: February 26, 2015 00:20 IST