प्रसन्न राणे - सावंतवाडी -‘स्वच्छ भारत... एक कदम स्वच्छता की ओर’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर राज्यात सर्व ठिकाणी स्वच्छतेचे अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने रायगड येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी सकाळी संपूर्ण राज्यभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या संस्थेच्यावतीने सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनीही या मोहिमेत सहभाग दर्शवित जिल्हाभरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविले. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनीही या उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढले. या स्वच्छता मोहिमेंतर्गत पंचायत समिती, नगरपालिका, शहरातील मोती तलावाचा परिसर, एसटी स्टँड व महामार्गानजिकचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यावतीने स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण महाराष्ट्र राज्य व राज्याबाहेरही रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळी आठ वाजल्यापासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानात सावंतवाडीसह वेंगुर्ले, मालवण, कणकवली येथील नगर पंचायती, नगर पालिकांच्या आवारात स्वच्छता करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात एक हजार याप्रमाणे संस्थेचे सुमारे पाच हजार सदस्य या अभियानात सहभागी झाले होते. या अभियानांतर्गत सावंतवाडी शहरातील मोती तलाव परिसर आणि रुग्णालयाच्या परिसरासह दहा ठिकाणची साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत संस्थेच्या सदस्यांसह शहरातील नागरिक आणि नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले होते. सावंतवाडी शहरातील सुमारे ५० टन कचरा उचलण्यात आला.यामध्ये सावंतवाडी एसटी बसस्थानक, गोविंद चित्रमंदिर ते न्यायालय, कोर्टाचा आतील परिसर, तहसीलदार कार्यालयाचा परिसर, पोलीस ठाणे, संत गाडगेबाबा महाराज व्यापारी संकुलाचा परिसर, इंदिरा गांधी व्यापारी संकुलाचा परिसर, मुख्य बाजार ते गांधी चौक, हॉटेल मँगोपर्यंत, हॉटेल मँगो व मोती तलावाचा परिसर, आरपीडी हायस्कूलचा परिसर, गार्डन आदी ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे साफसफाई करण्यात आली. साफसफाईनंतर जमा झालेला कचरा आणि गवत प्रतिष्ठानतर्फे दोन डंपर, तसेच सावंवाडी नगर पालिकेच्या तीन कचरा गाड्यांतून कचरा डेपोमध्ये जमा करण्यात आला. याकामी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभले. स्थानिकांचाही सहभाग रविवारी सकाळी ८ वाजल्यापासूनच या अभियानात सहभागी होण्यासाठी शहरवासीयांची गर्दी झाली होती. दुपारी ३ वाजेपर्यंत हे साफसफाईचे काम अविश्रांत सुरू होते. या आठ तासांच्या कालावधीत शहराचा शहराचा नक्शाच बदलून गेला होता. या साफसफाईमुळे सावंतवाडी शहर परिसर लख्ख झाला होता. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशाप्रकारे स्वच्छता अभियान राबवून यशस्वी करण्यात आले. प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोखपणे बजावविल्याने हे अभियान शंभर टक्के यशस्वी झाले.कणकवली शहरात ठिकठिकाणी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. लोकसहभाग महत्वाचा : साळगावकरसावंतवाडी नगरपालिकेतर्फे दरवर्षी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. परंतु एवढ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून असे पहिलेच अभियान शहरात झाले आहे. कोणत्याही अभियानाच्या यशस्वीतेकरिता लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो, हे आजच्या या स्वच्छता मोहिमेतून दिसून आले. यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि त्यांच्या सदस्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांचे मी आभार मानतो. या मोहिमेचा बोध शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी घेऊन शहराची स्वच्छता अबाधित राहण्यासाठी प्रयत्नशील रहावे.
जिल्ह्यात स्वच्छता मोहीम
By admin | Updated: November 16, 2014 23:56 IST