मालवण : सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाच्या शेवटच्या रात्री हिंदी आणि मराठी सिनेकलावंतांनी ‘जान’ आणली. मालवणची सुकन्या आणि आजची सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री क्रांती रेडकर हिने मालवणी भाषा माझ्या नसानसात भिनली आहे. मी नेहमीच मालवणीच्या टचमध्ये राहते असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. मॉलिवूड कार्यक्रमात ‘बाजीराव मस्तानी’ फेम अभिनेत्री स्मिता शेवाळे हिने ‘दिल क्या चीज है... जान लिजिए’ हा मुजरा सादर करून उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकविला. मालवण येथे नियोजन समिती, युएनडीपी आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने गेले तीन दिवस रात्रीच्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेते मकरंद अनासपुरे, सचिन खेडेकर, विजय कदम, विजय गोखले, मिलिंद गुणाजी, अभिनेत्री स्मिता शेवाळे, क्रांती रेडकर, कपिल विथ नाईट्स फेम अभिनेते रोहित प्यारे या कलावंतांनी हजेरी लावीत आपली कला पेश केली. अभिनेते सचिन खेडेकर यांनी कोकण ही चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी चांगले लोकेशन आहे. इथला निसर्ग हा विलोभनीय असल्याने इथे येणारा पर्यटक हा निसर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही असे टाळ्यांच्या गजरात सांगितले. यावेळी क्रांती रेडकर यांनी ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर मालवणच्या बालकलाकारांसमवेत नृत्य सादर केले. तसेच सिनेतारका माधुरी दीक्षित, श्रीदेवी, भाग्यश्री पटवर्धन यांच्या आवाजाची मिमिक्री सादर केली. सिनेअभिनेते विजय गोखले यांनी मॉलिवूड आॅर्केस्ट्रा कार्यक्रमात विनोदी स्क्रीप्ट सादर केले. याच कार्यक्रमात गोखले यांनी मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांची आठवण काढीत त्यांच्यामुळे कलाकारांना न्याय मिळाला. बाबूजी हे कलाकार आणि माणूस म्हणून वेगळे होते. त्यांच्या मालवणात येऊन कार्यक्रम सादर करताना आपल्याला आनंद होत असल्याचे सांगितले.यावेळी मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना अनासपुरे म्हणाले, माझे दोन गोष्टींमुळे कोकणावरील प्रेम वाढले आहे. एक म्हणजे कोकणचे निसर्गसौंदर्य व दुसरे कारण माझी पत्नी कोकणातील आहे. आता येथील सौंदर्य पर्यटनाच्या माध्यमातून जगभरात पसरले आहे. येथील पर्यटनवाढीसाठी शासन व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. परंतु पर्यटनाच्या माध्यमातून विकास करीत असताना येथील संस्कृती व परंपरा जपणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. यावेळी मॉलिवूड आॅर्केस्ट्रा कार्यक्रमातून रसिकांसमोर कलावंतांनी नृत्य सादर करून वाहवा मिळविली. (प्रतिनिधी)
सिने तारेतारकांनी आणली रंगत
By admin | Updated: February 2, 2015 23:52 IST