सावंतवाडी : मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करावा किंवा कोणाला वगळावे याबाबतचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यामुळे त्याबाबत मी भाष्य करणे योग्य नाही, असे मत शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी माडले. राज्यमंत्रिमंडळातील पाच ते सहा मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याची राजकीय चर्चा आहे. यावर शनिवारी सावंतवाडीत आलेल्या मंत्री दीपक केसरकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे अमित कामत शहरप्रमुख बाबू कुडतरकर, आबा केसरकर, महादेव राऊळ आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, मंत्रिमंडळात फेरफार करणे किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देणे बाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. तो विषय माझा नाही त्यामुळे मी त्यावर बोलणे उचित होणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा राज्यातील दंगल शासन पुरस्कृत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, खासदार विनायक राऊत राजकीय आरोप करत आहेत. त्यांची टीका निरर्थक आहे. त्यांच्या टिकेला महत्त्व देण्याची गरज नाही. मात्र मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे सांगितले.दरम्यान, मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मोती तलावातील कामाचा आढावा घेतला. तलावातील गाळ काढला जात असून याबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या तसेच कामाबाबत समाधान व्यक्त केले.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांनाच, दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं
By अनंत खं.जाधव | Updated: June 10, 2023 18:09 IST