The charm of snorkeling in Devbag | देवबागमधील ‘स्नॉर्कलिंग’चे आकर्षण
देवबागमधील ‘स्नॉर्कलिंग’चे आकर्षण

- महेश सरनाईक

सिंधुदुर्ग : पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग पाण्याने व्यापलेला आहे. जेवढे जीव-जंतू जमिनीवर आहेत, त्याहीपेक्षा जास्त पाण्यात आहेत. जितके सौंदर्य जमिनीवर आहे, त्याच्या कैकपटीने ते पाण्यात आहे. त्यामुळे आधीच सुंदर असलेला सिंधुदुर्ग आता अंतर्बाह्य सुंदर झाला आहे. काही वर्षांपूर्वी सागर संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूला पाण्याखाली असलेल्या प्रवाळांचा शोध लावला आणि येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवा खजिना खुला केला. यामुळे सिंधुदुर्गातील सागरी पर्यटन आता वैविध्यपूर्ण झाले आहे. त्यात स्नॉर्कलिंग हे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनत आहेत. देवबागमध्ये दरदिवशी शेकडो पर्यटक स्नॉर्कलिंगच्या माध्यमातून समुद्रतळाशी असलेल्या खजिना पाहण्याचा आनंद लुटत आहेत.

सरत्या वर्षाला निरोप आणि नुतन वर्षाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच सागर किनारे गर्दीने तुडूंब झाले आहेत. नाताळच्या सणानिमित्त असलेल्या सुट्टीचा विनीयोग करण्यासाठी देशभरातून विविध भागातून पर्यटक सध्या मालवणच्या आश्रयाला आले आहेत. त्यामुळे मालवण आणि नजिकच्या तारकर्ली, देवबाग या पर्यटनस्थळांवर कमालिची गजबज दिसून येत आहे.

मालवणकडून देवबागकडे जाताना वायरी, काळेथर, तारकर्ली आणि देवबागमध्ये प्रत्येक घरासमोर काही गाड्या पार्किंग केलेल्या दिसत आहेत. वायरी, तारकर्ली, देवबागमध्ये घरोघरी आता ‘होम स्टे’ ची संकल्पना राबविली जात असल्याने सुट्टीच्या हंगामात मजा लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने तारकर्ली आणि देवबागमध्ये वास्तव करत आहेत. त्यामुळे याठिकाणी असणारी सर्व हॉटेल्स, घरगुती खानावळीपासून अगदी पंचतारांकित पर्यंत सर्वच ठिकाणी हाऊसफुल्लचे फलक पहायला मिळत आहेत.

एका बाजूला कर्ली खाडी आणि दुसऱ्या बाजूला पसरलेला अथांग अरबी समुद्र या दोहोंच्यामध्ये वसलेला देवबाग परिसर सध्या महाराष्ट्रातील सर्वात सर्वांग सुंदर पर्यटनाचा हब ठरत आहे. तारकर्ली आणि देवबागमध्ये अनेक स्थानिक तरूणांनी वॉटर स्पोर्ट हा व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे. देवबागमध्ये अनेक तरूणांनी एकत्र येत किनारपट्टीवरून आतमध्ये सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकांनजिक स्नॉर्कलिंगचे जाळेच निर्माण केलेले आहे. त्यामुळे हे ठिकाण सध्या नावारूपास येत आहे.


देवबागमध्ये स्नॉर्कलिंगसाठी रिघ
डोके पाण्याखाली ठेवायचे आणि नळीव्दारे श्वासोश्वास करून पाण्याखालची अद्भूत दुनिया मनसोक्त पाहण्याचा खेळ म्हणजे स्नॉर्कलिंग. स्नॉर्कलिंगमुळे मालवणच्या पर्यटनाला नवी दिशा मिळाली आहे. त्यामुळे आता दरवर्षी येथे येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणिय वाढ होताना दिसत आहेत. खास करून शनिवार, रविवारच्या सुट्टीच्या दिवशी स्नॉर्कलिंगसाठी पर्यटकांची रिघ लागली आहे. 

 

असे उतरवले जातेय समुद्रात....
स्नॉर्कलिंगचा आनंद ८ ते ६0 वर्षापर्यंतच्या पर्यटकांना घेता येवू शकतो. यासाठी पोहता येण्याची गरज नाही. कमरेत लाईफ सेव्हिंग ट्यूब अडकवली की झाले. पण प्रत्यक्ष पाण्यात जाताना बरोबर प्रशिक्षित गाईडची गरज असते. देवबागमध्ये फायर बोटीतून जेथे कोरल्स आहेत तिथे समुद्रात नेण्यात येते. बोटीला अडकविलेल्या छोट्या शिडीने समुद्रात उतरविले जाते. तोंडात धरलेल्या नळीचे दुसरे टोक पाण्याच्यावर राहील अशापद्धतीने डोके पाण्यात बुडवायचे आणि शरीर पाण्याच्या पृष्ठभागावर समांतर ठेवायचे. हळूहळू श्वासोश्वास करीत जलतरांच्या दुनियेत प्रवेश करायचा.


या गोष्टी टाळाव्यात
स्नॉर्कलिंग करताना पर्यटक आणि व्यावसायिक या दोघांनीही अत्यंत जबाबदारीने हे खेळ करणे आवश्यक आहे. कोरल अत्यंत संवेदनशिल असल्यामुळे पर्यटकांनी त्यांना हात लावणे, त्यावर उभे राहणे किवा चालणे असे प्रकार टाळले पाहिजेत, बोटीचे नांगर टाकताना ते कोरल क्षेत्रापासून दूर टाकावेत, पाण्यात प्लास्टिक, खाद्यपदार्थांचे वेष्टणे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या टाकणे असले गलिच्छ प्रकार करू नयेत. कोरल नष्ट होण्याच्या भीतीमुळे काही देशात स्नॉर्कलिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.


जलक्रीडेचा आनंद लुटण्यासाठी गर्दी
पर्यटकांना हव्याहव्याशा सर्व गमंती जमती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्टस, हेरिटेज टुरिझम आणि भविष्यात होवू घातलेले विमानतळासारखे अनेक प्रकल्प हे सर्व अनुभवण्यासाठी महागडी परदेशवारी आता करण्याची गरज नाही. हे पर्यटकांनी जाणले असल्यामुळे जलक्रीडेसाठी मोठ्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. ईयर एंडिंगचा माहोल आहे आणि २0१९ या नवीन वर्षाची सुरूवात १ जानेवारीपासून होणार आहे. त्यामुळे १२0 किलोमीटर म्हणजे विजयदुर्ग पासून रेडीपर्यंत लांब स्वच्छ व सुंदर समुद्र किनारे, विस्तीर्ण खाड्या, नद्या आणि तलावांनी परिपूर्ण अशा सिंधुदुर्गमध्ये वॉटर स्पोर्टस (जलक्रीडा) साठी प्रचंड गर्दी होताना दिसत आहे.

Web Title: The charm of snorkeling in Devbag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.