मळेवाड : सातार्डा येथील ओटवणेवाडी येथील बाळा गावकर यांच्या चरायला गेलेल्या वासराचा बिबट्याने फडशा पाडला. या घटनेमुळे सातार्डा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सातार्डा परिसरात सध्या बिबट्याचे वास्तव्य दिसून येत आहे. सातार्डा ओटवणेवाडी येथील बाळा गावकर यांनी आपल्या गुरांना मंगळवारी चरण्यासाठी सोडले होते. अन्य गुरांसोबत गेलेले वासरु परत न आल्याने गावकर यांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, त्या वासराला बिबट्याने फस्त केल्याने केवळ काही अवशेषच आढळून आले. तसेच या परिसरात काही दिवस बिबट्याचा ओरडण्याचा आवाजही येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीने वातावरण पसरले आहे. सातार्डा परिसरातील डोंगर मायनिंगमुळे पुरते नष्ट झाले असल्याने सातार्डा, सातोसे, कवठणी या परिसरात रानटी प्राण्यांनी मानवी वस्तीकडे चाल केली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वनविभाग अशा घटनांकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यांनी या परिसरात फिरणार्या या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. (वार्ताहर)
बिबट्याकडून वासराचा फडशा
By admin | Updated: May 16, 2014 00:23 IST