--लोकमत जागर पाणी असूनही घरापर्यंत पुरविण्याचे साधन नाही, सौंदर्यपूर्ण आणि हिरवाईने नटलेला निसर्ग आहे पण त्याचे संवर्धन नाही, मेहनतीच्या जोरावर शेती उत्पन्न आहे पण रस्त्यांच्या अभावामुळे बाजारपेठही नाही. तर विद्यार्थी असतानाही शाळेची सोय नाही. वीजेची सोय असतानाही अंधार दूर करण्यासाठी कोणीही वाली नाही, मानवी जीवनाची वस्ती आहे, पण आरोग्य टिकविणारी यंत्रणाच नाही. आम्ही जगावं तरी कसं? चंद्रासह मंगळावर वस्ती करू पाहणाऱ्या शासनाने आधी राहत्या घराकडे तरी पहावे. समस्यांनी पछाडलेले आणि विकासापासून दुरावलेले आमचेही छोटेसे गाव आहे. आतातरी पाहा आमच्याकडं ? ही करूणेची आर्त हाक आहे दाभील गावच्या गावकऱ्यांची. सावंतवाडी तालुक्यातील बांदा बाजारपेठेपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम भागातील असलेले हे गाव समस्येच्या गर्द मळभाने झाकोळले गेले आहे. जनतेला गावाच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत असून, गाव भूतकाळात जमा होण्याची भीती वाटू लागली आहे. महेश चव्हाण ल्ल ओटवणे पांडवकालीन विविध वैशिष्ट्यांची साक्ष आणि शिवकालीन राजे-महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गावावर ग्रामदैवत श्री देवी माऊलीच्या कृपाशिर्वादाने निसर्गाची मुक्त उधळण आहे. सह्याद्रीच्या डोंगरपायथ्याशी वसलेल्या या छोट्याशा गावात २५ घरे आणि ७० ते ८० एवढी विरळ लोकसंख्या आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काट्याकुट्यातूनच मार्ग काढत या दुर्गम भागात येथील कुटुंबे आपली गुजराण करतात. २१ व्या शतकातही विकासापासून कोसो मैल दूर असलेले दाभीलवासीय आजही विकासाच्या सूर्याेदयाकडे टक लावून आहेत! शासनाची एकही पेयजल योजना गावात राबविली नसून ग्रामदेवता श्री माऊलीच्या धार्मिकतेमुळे विहीर खोदण्यास गावात मनाई आहे. त्यामुळे बारमाही वाहणाऱ्या दाभील नदीचाच पाण्यासाठी आधार घ्यावा लागतो. मात्र तीही दूर असल्याने दाभीलवासीयांना वणवण करावी लागते. घनदाट जंगल, निसर्गाचा मनमोहक नजराणा, बारमाही वाहणारे नदीपात्र यामुळे दाभील गावात जैवविविधतेची कमतरता नाही. विविध जातीचे प्राणी, पक्षी, कीटक, फुलपाखरे, विविध वनौषधी या निसर्र्गाच्या खजिन्याकडे निसर्गप्रेमी व अभ्यासक आकर्षित न झाले तरच नवल! मात्र, हा अनमोल ठेवा प्रसिध्दीपासून अजूनही दूरच आहे. कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नसल्यामुळे पर्यटक तथा अभ्यासक या जैवविविधतेकडे पाठ फिरवितात. सरमळे धरण प्रकल्प विकासाच्या मुळावर मागील दहा वर्षांपासून सरमळे येथील धरण प्रकल्पाने दाभील गावाच्या विकासाला खीळ बसली आहे. सध्यातरी न्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकल्पाला स्थगिती मिळाली आहे. मात्र, धरण झालेच पाहिजे, या शासनाच्या अट्टाहासामुळे गाव पुरता धुळीस मिळाल्यागत झाले आहे. प्रस्तावित प्रकल्पामुळे दाभील गाव पूर्णत: बुडित क्षेत्रात येते. त्यामुळे येथील विकासकामे करून काही उपयोगाचे नाही. शासनाच्या या धोरणामुळे दाभील गावाच्या नकाशावरील विकासकामे मंजुरीस आणली जात नाहीत. नदीमध्ये अस्वच्छताही वाढली आहे. दाभील नदी विविध पांडवकालीन वैशिष्ट्यांनी भरली असून, कुुंभगर्ते, रांजण खळगे या ठिकाणी पहायला मिळतात. पण उगमाच्या ठिकाणी घातलेल्या बेकायदेशीर बंधाऱ्यामुळे ही पर्यटनस्थळे दिसेनाशी झाली आहेत. दाभील-कोनशी ही ग्रुपग्रामपंचायत असल्याने त्याचाही विकासावर मोठा परिणाम होतो. या दोन्ही गावांमध्ये जवळपास १० किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे बऱ्याचवेळी या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. गावातील विविध शासकीय पदे अजून रिक्त असून, शासनाचे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. दाभीलवासीयांसाठी रस्त्याचा यक्षप्रश्न दाभील गावात रहदारीसाठी ग्रामस्थांच्या श्रमदानातून पायवाटेचे रस्त्यात रूपांतर झाले आहे. हा रस्ता आजही डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत आहे. शिवाय या मार्गावरील छोटे पूलही ढासळण्याच्या स्थितीत असून संपर्कही धोक्यात येणार आहे. ठिकठिकाणी खड्डे, दलदल व मोठमोठ्या पडलेल्या चर पार करूनच या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे गावातील एकमेव बांदा-दाभील ही बस सेवा अधूनमधून बंदच असते. खासगी दुचाकी, चारचाकी वाहने चालविणेसुध्दा जिकरीचे होत असल्याने बाजारपेठेत जाण्यासाठीचे विघ्न कायम आहे. पाचवीपर्यंतच शिक्षण गावात उपलब्ध असून पुढील शिक्षणासाठी परगावी जावे लागते. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून फारकत घेण्याचा धोका आहे. ही दाभीलवासीयांची शोकांतिका असून ती कधी संपणार, हे न उलगडणारे कोडेच आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या घरांवर नांगर फिरवून आपली पोळी भाजू पाहणाऱ्या शासनाने येथील विकासकामांबाबत टाळाटाळ केल्यास आता आंदोलन छेडण्याचा पवित्राही ग्रामस्थांनी घेतला आहे.
अस्तित्वासाठी पराकोटीचा संघर्ष
By admin | Updated: August 24, 2016 23:40 IST