सावंतवाडी : गोव्यातील लोटली येथून अपहरण झालेला मुलगा मंगळवारी सावंतवाडी-मळगाव रेल्वेस्थानकावर आढळून आला. सिध्दांशू कुमार (वय १४) असे या मुलाचे असून त्याला रात्री उशिरा गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.गोव्यातील लोटली येथील सिध्दांशू कुमार हा मुलगा २३ आॅगस्ट रोजी शाळेतून बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी याबाबत मडगाव-लोटली पोलिसात अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानुसार गोवा पोलिसांनी गेले पंधरा दिवस शोध मोहीम राबविली. मात्र, सिध्दांशू कुठेही आढळून आला नव्हता.दरम्यान, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास मळगाव रेल्वस्थानकावर एक मुलगा फिरताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी बघितले. त्याची चौकशी केली असता, तो एकटाच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याबाबत सावंतवाडी पोलिसांना कळविले. सावंतवाडी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन संपूर्ण माहिती घेतली व गोवा पोलिसांना कळविले. सिध्दांशू याने त्याला कोणी नेले, याबाबत कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. मात्र, आपण घरातून बेपत्ता झाल्यानंतर मालाड येथील हॉटेलमध्ये कामास होतो. तेथून पैसे संपल्यानंतर गोवा येथे आपल्या घरी जाण्यास निघालो, पण मळगाव रेल्वेस्थानकावर उतरल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, रात्री उशिरा गोवा-मडगाव पोलिसांच्या पथकाने सावंतवाडीत दाखल होत मुलाला ताब्यात घेतले. यावेळी गोवा पोलिसांना विचारले असता, सिध्दांशू बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर मडगाव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत काहींची चौकशी केल्याचे गोवा पोलिसांनी सांगितले. अधिक तपास सिध्दांशू याला गोव्यात घेऊन गेल्यानंतर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
गोवा येथून अपहरण झालेला मुलगा सावंतवाडीत सापडला
By admin | Updated: September 16, 2014 23:33 IST