देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी झाल्याने अतिरिक्त रुग्ण दाखल करून घेण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविल्याने गुरुवारी दुपारी भाजपा कार्यकर्त्यांनी रुग्णालयामध्ये आंदोलनाचा मार्ग अवलंबिला. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांच्या समस्यांबाबत भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी जाब विचारला. यावेळी तालुकाध्यक्ष सदाशिव ओगले, महेश खोत, नरेंद्र भाबल व अन्य कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक भिसे यांची भेट घेऊन इच्छुक रुग्णांना तत्काळ दाखल करून घेण्याची मागणी केली. अखेर रुग्णालयातील खाटांच्या मधल्या जागांत गाद्या अंथरून ४ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले.देवगड शहरात पावसाळी वातावरणामुळे सध्या तापसरीसदृश रुग्णांची संख्या ग्रामीण रुग्णालयात वाढत आहे. सरासरी ८ ते ९ आंतर व बाह्य रुग्ण औषधोपचारासाठी येत आहेत. तर सुमारे १८० ते २०० रुग्ण आतापर्यंत औषधोपचार करून गेले असल्याची माहिती डॉ. भिसे यांनी दिली. अचानक रुग्णसंख्या वाढली आहे तर दुसरीकडे गणेशोत्सव काळातच नर्सेस, वॉर्डबॉय यांची कमतरता भासत असल्याची तक्रार रुग्णालयात दाखल रुग्णांनी खासगीरित्या बोलून दाखविली. तर केसपेपर बनविण्यासाठी ५ रुपये लागत असताना दररोज नवीन केसपेपर बनवून रुग्णांकडून पैसे वसूल केले जात असल्याचा आरोपही रुग्णांकडून होत होता. (प्रतिनिधी)
भाजपाचे आंदोलन-देवगड ग्रामीण रुग्णालयातील समस्या
By admin | Updated: September 11, 2014 23:12 IST