रत्नागिरी : माझ्यावर गद्दारीचा आरोप करणारे आमदार भास्कर जाधव जेव्हा राष्ट्रवादीत आले तेव्हा आधी सेना नेत्यांच्या मांडीवर त्यांनी घाण केली नाही काय, असा सवाल करीत भास्कर जाधव हेच गद्दारीचे महामेरू आहेत, असा पलटवार आमदार उदय सामंत यांनी आज त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. गुरुवारी सायंकाळी शहरातील राजिवडा येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत माजी मंत्री, आमदार भास्कर जाधव यांनी आमदार उदय सामंत यांच्या गद्दारीवरून जोरदार टोलेबाजी केली होती. राष्ट्रवादीत पुढे पुढे असणाऱ्या उदय सामंत यांना सेनेच्या रांगेत शेवटी उभे राहावे लागते आहे. सेनेत बाकी सर्व वाघ; तर सामंत यांचे मांजर झाले आहे आणि त्यांना हीच मोठी शिक्षा असल्याचा टोला आमदार भास्कर जाधव यांनी प्रचारसभेत लगावला होता. जाधव यांच्या आरोपांवर आज सामंत यांनी पत्रकारपरिषदेत पलटवार केला. त्यांच्या गद्दारीचा पाढा वाचला. खरेतर जाधव हेच गद्दारांचे महामेरू आहेत. कारण त्यांनी अनेकवेळा पक्षाशी गद्दारी केली आहे. चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत रमेश कदम यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी लढत असताना त्यांनी समांतर आघाडी उभी केली व राष्ट्रवादीच्या विरोधात गद्दारी केली. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांपासून जाधवांच्या आघाडीचे नगरसेवक दूर राहिले होते. अनिल तटकरेंच्या विधानपरिषद निवडणुकीच्या वेळीही जाधवांनी अनेकांना राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करायला लावून पक्षाशी गद्दारीच केली, असे ते म्हणाले. ढोल वाजवण्याच्या मुद्द्याचाही सामंत यांनी समाचार घेतला. आम्ही रत्नागिरीकर स्वत:च्या मालकीचे ढोल स्वत:च्या गळ्यात घालून वाजवतो. दुुसऱ्याच्या खर्चाने आणलेले ढोल वाजवत नाही, हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. आताही तेच होणार आहे, असा टोलाही त्यांनी भास्कर जाधव यांना लगावला. भाजपचे प्रवक्ते बाळ माने यांच्यावर हल्लाबोल करताना सामंत म्हणाले, आम्हाला दलबदलू म्हणणारे माने हे तीनवेळा पराभूत झाले आहेत. मच्छिमार संघाच्या १८ मतांच्या निवडणुकीतही ते पराभूत झाले. पोटनिवडणुकीत चारही उमेदवारांची जप्त होणारी अनामत वाचवून दाखवा, असे सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)+त्यांचा अपमानच...राजिवड्यातील राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत तेथील राष्ट्रवादीचे नगरसेवक सईद पावसकरांना व्यासपीठावर स्थानच दिले गेले नाही. बशीर मुर्तुझा यांना कोपऱ्यातील खुर्चीत बसवून उमेश शेट्येंनी नेत्यांच्या शेजारची खुर्ची पटकावली, हासुध्दा बशीर मुर्तुझा यांचा अपमानच आहे.कुवत ओळखूनच मंत्रीपदमी राज्यमंत्री असताना माझी कुवत ओळखूनच मला राष्ट्रवादीत पालकमंत्रीपद मिळाले. जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री असूनही जाधव यांना त्यांची कुवत नसल्यानेच पुन्हा पालकमंत्रीपद मिळाले नाही. सामंत पालकमंत्री झाले म्हणून आपण कोणतीही तक्रार न करता कॅबिनेट मंत्री असूनही गप्प राहिल्याचे जाधव म्हणत आहेत, हे हास्यास्पद आहे.
भास्कर जाधवांवर सामंतांचा पलटवार
By admin | Updated: October 30, 2015 23:41 IST